कन्नड (औरंगाबाद ) : भरधाव हायवाने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मृतांमध्ये औराळा येथील यात्रेवरून परतणाऱ्या दुचाकीस्वार त्याची मुलगी आणि मित्राचा समावेश आहे. संदीप बाळू गायकवाड (२७), अनुसया संदीप गायकवाड ( ४) व प्रमोद गायकवाड (३०, सर्व राहणार अंधानेर तालुका कन्नड ) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधानेर येथील संदीप गायकवाड हे दुचाकीवर (क्र. एमएच २० इएम ६९८२ ) मुलगी अनुसया आणि मित्र प्रमोद गायकवाड यांच्यासह औराळा येथे यात्रेसाठी गेले होते. सायंकाळी यात्रेवरून ते परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सध्या या भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. या कामावरील दिलीप बिल्डकॉन कन्स्ट्रक्शन कंपनीचा खदानीतुन दगड घेऊन स्टोन क्रेशर कडे एक हायवा ( एमपी ३९ एच१७७२ ) जात होता. या हायवाने रेलगाव तांडा येथे संदीप यांच्या दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील तिघेही रस्त्याच्या बाजूला पडले. यात प्रमोद जागीच ठार झाला तर संदीप व अनुसया गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या प्रकरणी दिपक अंबादास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हायवा चालक प्रदीपकुमार शिवकुमार वैश्य ( मध्य प्रदेश ) याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोउपनि. विजय आहेर करीत आहेत.