लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोरोना रुग्णसंख्या पुढील काही दिवसांत कमी झाली तर पर्यटनस्थळे खुली करण्याचा सकारात्मक निर्णय होईल. दहा दिवसांत आकडे कमी होतील, अशी अपेक्षा आहे, असे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बुधवारी येथे सांगितले.
विभागीय आयुक्तालयात त्यांनी विविध बैठका घेतल्या. विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत आढावा घेऊन निर्णय होईल. पर्यटनासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, हा चर्चेचा मुद्दा आहे. डेक्कन ओडिसीचा लाभ सामान्य प्रवाशांना झाला पाहिजे. मध्यंतरी काढलेले टेंडर व्यपगत (लॅप्स) झाले. आता नव्याने टेंडर काढण्यात येईल.मराठवाड्यात ‘क्लायमेंट चेंज’चा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात येणार असून, लवकरच त्यावर काम सुरू होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. औरंगाबाद म्हणून नाही, तर मराठवाड्याच्या क्लायमेंट चेंज ॲक्शन प्लॅनबाबत विचार सुरू आहे. २०११ पासून २०१८ पर्यंत दुष्काळानंतर महापूर, ओला दुष्काळ, ढगफुटीसारखे वातावरण विभागात निर्माण झाल्याचे दिसते आहे. अधून-मधून गारपीट होत आहे. शहरी व ग्रामीण भागात वातावरण बदलाबाबत कसा लढा देता येईल, याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे.
शेतकऱ्यांपर्यंत वातावरण बदलाबाबत माहिती द्यावी लागेल. शहरी ते ग्रामीण जनजागृती करण्यासाठी ‘ॲक्शन बेस प्लॅन’ तयार करावा लागेल. पर्यावरणाशी सुसंगत वाहने वापरावी लागतील. २०२५ पर्यंत ऊर्जेच्या नवीन स्रोतांवर लक्ष देण्याचे धोरण आहे, असे ठाकरे म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा२०२० अर्थसंकल्पात पर्यटनाला चालना मिळाली होती. कोरोनाकाळात आरोग्य विभागाला जास्तीचे पैसे द्यावे लागले. अर्थमंत्र्यांनी इतर खात्यांना निधी देण्याचे नाकारलेले नाही. येत्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सर्व खात्यांसाठी तरतुदी होतील, अशी अपेक्षा आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी निधी मिळत नसल्याची टीका केली आहे, त्यावर ठाकरे म्हणाले, आम्ही एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे निधी-कमी जास्त मिळतो, असा काही प्रश्न नाही. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपावर त्यांनी बोलणे टाळले.