डेंग्यूचा ताप, मनपात संताप
By Admin | Published: July 11, 2014 12:55 AM2014-07-11T00:55:43+5:302014-07-11T01:05:07+5:30
औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने मनपा आरोग्य विभागावर निष्क्रियतेचे खापर फोडले.
औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्याने मनपा आरोग्य विभागावर निष्क्रियतेचे खापर फोडले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांचा पदभार काढण्यासाठी घोषणाबाजी करीत महापौर कला ओझा यांच्यासमोर ठिय्या दिला.
आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याचे सांगितल्यानंतर नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले. सभागृह नेते किशोर नागरे म्हणाले, पावसाळा लागला असून, डासांची पैदास वाढल्यामुळे तापेचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत.
मनपा दप्तरी तीन महिन्यांत ४६ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून, एन-८ मध्ये ३८ डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. नगरसेविका छाया वेताळ म्हणाल्या, माझ्या वॉर्डातील महिला आघाडीच्या शाखाप्रमुखांचे डेंग्यूमुळे निधन झाले आहे.
नगरसेवक अभिजित देशमुख यांच्या नातेवाईकाच्या मुलाला डेंग्यू झाला आहे. असे असताना औषधी फवारणी, धूरफवारणी कुठे होते, याची काहीही माहिती आरोग्य विभाग देत नसल्याचा आरोप सदस्य राजू वैद्य, समीर राजूरकर, प्रीती तोतला, मुजीब खान यांनी केला. उपमहापौर संजय जोशी म्हणाले, डॉ. कुलकर्णी यांना शासनाकडून निधी आणण्याच्या कामासाठी नियुक्त करावे. दरम्यान, डॉ.कुलकर्णी यांच्या विरोधातील प्रस्तावावर ७० नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या केल्या.
प्रभागनिहाय जन्म-मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी
आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे काम रेंगाळले आहे. प्रभागनिहाय नोंदणीसाठी प्रभाग अधिकाऱ्यांना स्वायत्तता देण्यात येणार आहे. नावात दुरुस्तीदेखील प्रभाग कार्यालयातच होईल.
तसेच वॉर्डनिहाय औषधी फवारणी सोमवारपासून सुरू होईल. नगरसेवकांकडे फवारणीची यादी दिली जाईल.
आरोग्य अधिकाऱ्याची स्वेच्छा निवृत्ती
डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्याबाबत आलेल्या तक्रारींची चौकशी होईपर्यंत त्या रजेवर असतील. त्यांच्या नियुक्ती प्रकरणात हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत.
चौकशी होईपर्यंत डॉ. संध्या टाकळकर यांच्याकडे आरोग्य अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १० ते १२ दिवसांत चौकशी पूर्ण होईल, असा दावा आयुक्तांनी केला. सभागृहातच डॉ. कुलकर्णी यांनी रजेचा अर्ज आयुक्तांना लिहून देत सभागृह सोडले. दरम्यान, कुलकर्णी यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी तावातावाने अर्ज दिला. या प्रकरणी डॉ. कुलकर्णी यांच्याशी साधला असता व्हीआरएससाठी अर्ज दिल्याचे त्या म्हणाल्या.
पुरस्कारानंतर असाही सत्कार
११ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या पुरस्कार समारंभास डॉ. कुलकर्णी जाणार असून, त्यांना स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी शहरात के लेल्या कामगिरीबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.