औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूचा जिल्ह्यातही फैलाव झाला आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये तब्बल ५२ रुग्णांना डेंग्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला, असे असले तरी अनेक गावांमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे.
औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात डेंग्यूची लागण झाली आहे. ग्रामीण भागात लागण झालेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसह साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. बारडकर यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागातर्फे रॅपिड टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात येत आहे. यात डेंग्यूची लागण झाली असल्याची शक्यता वाटल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) प्रयोगशाळेत ‘एलायझा’ टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. बारडकर यांनी दिली. या टेस्टनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५२ रुग्णांना डेंग्यू झाला आहे.
यात सर्वाधिक रुग्ण हे सिल्लोड तालुक्यातील आहेत. मात्र, डेग्यूची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावाही त्यांनी केली. तलवाडा गावात रुग्णाचा मृत्यू हा डेंग्यूने झालेला नाही. इतर आजार असल्यामुळे उलटी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचेही दिलेल्या भेटीमध्ये स्पष्ट झाले. औरंगाबाद तालुक्यातील २ रुग्णांना डेंग्यू झाला आहे. तर पैठण तालुक्यात १, खुलताबाद ७, गंगापूर ५, वैजापूर ११, सिल्लोड १९, सोयगाव २, फुलंब्री १ आणि कन्नड तालुक्यात ४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.
या उपाययोजना केल्या जाताहेत ग्रामीण भागात तापाचे रुग्ण आढळताच तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात पाठविले जात आहे. याशिवाय गावोगाव ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’ करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिलेल्या भेटीमध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उघड्या आहेत.४या विहिरीच्या परिसरात अस्वच्छता असून, डास उत्पादन याच ठिकाणी होत असल्याचेही पाहणीत आढळून आल्याचे डॉ. बारडकर यांनी सांगितले. यामुळे गटविकास अधिकारी, पंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामपंचायतींना डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना देण्यास सांगितले आहे.
५० प्राथमिक, तर २६९ उपकेंद्रांमार्फत प्रयत्नडेंग्यूची लागण रोखण्यासाठी जिल्हाभरात असलेल्या ५० प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि २६९ उपकेंद्रांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहितीही डॉ. बारडकर यांनी दिली. प्रत्येक गावात जाऊन आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय डेंग्यूची लागण होण्याची प्राथमिक लक्षणे आढळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी संबंधित गावात जाऊन तपासणी करीत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.