औरंगाबाद : सरकारी पंच होण्यास नकार देणे महापालिकेच्या लिपिक आणि शिपायाला बुधवारी चांगलेच महागात पडले. जवाहरनगर पोलिसांनी त्या लिपिक आणि शिपायाविरोधात बुधवारी रात्री गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई सुरू केली.लिपिक गोविंद बाराबोटे आणि शिपाई दशरथ जोंधळे अशी गुन्हा नोंद झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले की, जवाहरनगर ठाण्यात १२ डिसेंबर रोजी दाखल एका गुन्ह्यातील आरोपीच्या घराचा पंचनामा करण्यासाठी पोलिसांना दोन पंचांची आवश्यकता होती. त्यामुळे आम्ही मनपा वॉर्ड ‘फ’ च्या अधिकाºयांना पत्र देऊन सरकारी कामासाठी दोन कर्मचारी देण्याचे कळविले. त्यानंतर वॉर्ड अधिकाºयांनी लिपिक गोविंद बाराबोटे आणि शिपाई दशरथ जोंधळे यांची नावे कळविली. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून पंच म्हणून पोलीस ठाण्यात हजर होण्याचे त्यांना आदेशित केले. त्यावेळी त्यांनी पंच म्हणून येण्यास स्पष्ट शब्दांत नकार देऊन ते पोलीस ठाण्यात आले नाही. दोन्ही कर्मचाºयांनी सरकारी कामात मदत न केल्याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. कांबळे यांनी फिर्याद नोंदविली. त्याआधारे दोन्ही कर्मचाºयांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.
सरकारी पंच होण्यास नकार, लिपिकावर नोंदविला गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:56 PM