उद्योगनगरीत मोकळ्या भूखंडावर उभारणार घनदाट जंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:02 AM2021-02-17T04:02:17+5:302021-02-17T04:02:17+5:30
वाळूज महानगर : स्वच्छ, सुंदर व हरित वाळूज एमआयडीसी करण्यासाठी मराठवाडा इन्व्हायर्न्मेंट क्लस्टर सेंटर (एमईसीसी) या उद्योजक संघटनेने पुढाकार ...
वाळूज महानगर : स्वच्छ, सुंदर व हरित वाळूज एमआयडीसी करण्यासाठी मराठवाडा इन्व्हायर्न्मेंट क्लस्टर सेंटर (एमईसीसी) या उद्योजक संघटनेने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत एमआयडीसी प्रशासन, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी व उद्योजकांच्या मदतीने उद्योगनगरीतील मोकळ्या भूखंडावर झाडे लावून घनदाट जंगल उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत मोकळ्या भूखंडावर कचऱ्याची साफसफाई व काटेरी झुडपे तोडून वृक्षारोपण करण्यासाठी या भूखंडाची स्वच्छता केली जात आहे. या मोकळ्या भूखंडांवर ५० पेक्षा अधिक जातीची झाडे लावून संगोपन केले जाणार आहे. वाळूज एमआयडीसी परिसरात उद्योजक संघटनांच्यावतीने गत चार ते पाच वर्षांपासून स्वच्छ, सुंदर व हरित एमआयडीसी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत औद्योगिक क्षेत्रात हजारो झाडे लावून ही झाडे जगविण्यात आली आहेत. आता एमईसीसीने पुन्हा पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेवर भर दिला आहे.
चौकट
सुंदर व हरित वाळूज एमआयडीसी
वाळूज एमआयडीसीतील मोकळ्या पडलेल्या भूखंडावर अनेकजण कचऱ्याची विल्हेवाट लावत असल्याने अस्वच्छता पसरत आहे. याशिवाय कंपन्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी एमईसीसीने स्वच्छ, सुंदर व हरित वाळूज एमआयडीसी करण्याची मोहीम नव्या जोमाने हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी एमईसीसीचे अध्यक्ष कमल पहाटे, सचिव संजय कुलकर्णी, उपाध्यक्ष अंकुश लामतुरे, राजेश मानधनी, रवींद्र कोंडेकर, आदींनी पुढाकार घेतला आहे. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उपअभियंता सुधीर सुत्रावे आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या प्रयत्नातून हा उपक्रम राबविला जाणार आहे.
फोटो ओळ- वाळूज एमआयडीसी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी मोकळ्या भूखंडाची साफसफाई केली जात आहे.