जळगाव घाटचा विश्वास शिरसाठ बनला उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:33 AM2019-02-21T00:33:35+5:302019-02-21T00:34:04+5:30
ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या तरुणाने दाखवून दिले आहे.
चापानेर : ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या तरुणाने दाखवून दिले आहे. राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन चापानेर पंचक्रोशीतील तो पहिला उपजिल्हाधिकारी बनला आहे. परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
विश्वास शिरसाठ यांचे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. विश्वासचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातील जळगाव घाट या लहान खेडेगावात झाले. दहावीचे शिक्षण कन्नड येथील काकासाहेब देशमुख शाळेत. बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी जिंतूर येथे नगरपरिषदेत कनिष्ठ विद्युत अभियंता या पदावर नोकरी केली. मात्र, लहानपणापासून उपजिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने अखेर त्या नोकरीचा जानेवारी २०१५ मध्ये राजीनामा दिला. नोकरी सोडली त्यावेळी खूप जणांनी नाव ठेवले. मात्र ध्येय न सोडता तीन वर्षे सतत ८ ते १० तास स्वअभ्यासावर भर दिला. त्यांनी राज्यसेवेच्या चार परीक्षा दिल्या, त्यात कमी फरकाच्या गुणामुळे अपयश आले. तरीही जिद्द न सोडता त्यांनी अखेर मेहनतीने जोरावर हे यश संपादन करून लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडून करिअर केले पाहिजे. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला नोकरी सोडली तरीही पाठींबा दिला. या यशाचे श्रेय ते आई- वडील,भाऊ, शिक्षक वर्ग, मित्र परिवार व ग्रामस्थांना देतात. या यशाने मुलाने पांग फेडल्याची भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना इंजिनिअरिंग शिक्षणाचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करून लोककेंद्रीत कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.