मुख्य रस्त्याचे भाग्य उजाडेना
By Admin | Published: July 30, 2014 01:08 AM2014-07-30T01:08:28+5:302014-07-30T01:17:47+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरात प्रवेश करणाऱ्या आमदार रोडला १४ लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु टेंडर दोन वेळा आचारसंहितेत अडकल्याने रस्ता तसाच उखडलेला आहे.
औरंगाबाद : सातारा परिसरात प्रवेश करणाऱ्या आमदार रोडला १४ लाखांचा निधी मंजूर झाला; परंतु टेंडर दोन वेळा आचारसंहितेत अडकल्याने रस्ता तसाच उखडलेला आहे.
या रस्त्याने विद्यार्थी, कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसेसची सतत वर्दळ असते. भारत बटालियनच्या कर्मचाऱ्यांचीही ये-जा सुरू असून, सिमेंट रस्त्यावर अनेक खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणापूर्वी ते चांगले व्हावेत यासाठी रहिवाशांनी आवाज उठविला होता. जिल्हा परिषदेकडून या रस्त्यासाठी निधी मंजूर आहे; परंतु लोकसभा व पदवीधर निवडणुकीदरम्यान टेंडर अडकले आणि कामात अडथळा आला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेने पुन्हा निविदा बोलावली असली तरी विधानसभेच्या निवडणूक आचारसंहितेत पुन्हा ती प्रक्रिया अडकते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. संग्रामनगर उड्डाणपुलापासून सातारा परिसर, गाव आणि भारत बटालियन व विविध महाविद्यालयांना जाण्यासाठी हाच रस्ता आहे.
शहरात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता
आदळ आपटीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून रस्त्याचे भाग्य केव्हा उजळणार?
शहरात जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून, मुख्य रस्ता गुळगुळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाठपुरावा सुरू
जिल्हा परिषद सदस्य योगिता बहुले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, रस्त्यासाठी निधी मंजूर असून, कामासाठी पाठपुरावा केला जात आहे. टेंडर काढण्यात आले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
सातारावासीयांना
कायम त्रास
सातारावासीयांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यात तत्परता दाखविली जात नाही. परिणामी नागरिकांना कायम त्रास सहन करावा लागतो.
-वृषाली कुऱ्हे
खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाढली
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांना अपघात होण्याची भीती वाढली आहे. रस्ता मजबुतीचे काम विभागाने लवकर हाती घ्यावे.
-स्नेहा पवार
मुलांच्या जिवाशी
खेळू नका
शाळकरी विद्यार्थ्यांना स्कूल व्हॅनमधून या रस्त्याने जाताना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे घोडे नेमके अडले कुठे ?
-सविता कुलकर्णी