औरंगाबाद: जिल्ह्यात सध्या अंशत: लॉकडाऊन सुरू असून त्या काळात हॉटेल्स, परमीटरुम्समध्ये नियमापेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यामुळे १७ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत हॉटेल्समधील डायनिंग सेवा बंद ठेऊन, पार्सल सेवा सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी दिले. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सुधारीत आदेश काढले आहेत.
या आदेशाची माहिती देतांना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, अंशत : लॉकडाऊन सध्या सुरू आहे. या काळात मी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जि.प.सीईओंच्या पाहणीत हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, वाईन शॉप, नाश्ता सेंटर, फुडपार्क, रिसोर्ट, ढाब्यांवर गर्दी असल्याचे निदर्शनास आले. कोरोना संसर्ग वाढीसाठी सदरील बांब गंभीर असल्यामुळे वरील ठिकाणी डायनिंग सुविधा (टेबल,खुची व इतर आसनावर बसून खाणे-पिणे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्सल सुविधा, घरपोच सेवा सुरू ठेवण्याची परवानगी सदरील आस्थापनांना देण्यात येत आहे. १७ मार्च सकाळी ६ वाजेपासून हे आदेश लागू होणार आहेत.या पत्रकार परिषदेला अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त शहा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कदम आदींची उपस्थिती होती.