वाळूज महानगर : आषाढी यात्रेला विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेरगावांहून येथील पंढरपुरात आलेले भाविक व दिंड्यांतील वारकऱ्यांना राहण्याची कोणतीच व्यवस्था नव्हती. त्यामुळे बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसात भाविकांना भिजावे लागले.जिल्ह्यातील छोटे पंढरपूर म्हणून वाळूज औद्योगिक क्षेत्रातील पंढरपूरची ख्याती आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक व वारकऱ्यांची मोठी गर्दी होते. विठ्ठल- रुक्मिणीचे दर्शन सुलभपणे व्हावे, रात्री पाऊस झाल्यास सुरक्षित निवारा म्हणून मंदिर नियोजन समितीने केलेले प्रयत्न अपुरे ठरले. त्यामुळे भाविकांना ऊन, पाऊस सहन करीत दर्शनासाठी तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. रात्री पावसात भिजत कीर्तन ऐकावे लागले. यासंदर्भात मंदिर समितीचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही. स्वयंसेवक व पोलिसांची दादागिरीदर्शनासाठी आलेल्या भाविकांना काही पोलीस व मंदिर कमिटीने नेमलेल्या काही स्वयंसेवकांची दादागिरी सहन करावी लागली. त्यामुळे अनेक भाविकांना दर्शन झाले नाही. काही पोलीस कर्मचारी व स्वयंसेवकांनी अनेक पुरुष- महिला भाविकांना धक्काबुक्की केली. मंदिरात रांगेत आलेल्या भाविकांना हे स्वयंसेवक व पोलीस दर्शन न घेऊ देताच जोर जोरात पुढे ढकलत होते. महिलांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. मंदिराला दान म्हणून महिन्याकाठी ५० ते ६० हजार, तर गाळ्याच्या भाड्यापोटी महिन्याला ४० ते ५० हजार रुपये मिळतात. आषाढी व कार्तिकी यात्रेत मिळून किमान ४ लाख रुपये जमा होतात. वर्षाला मंदिराची १५ ते १६ लाख रुपयांची उलाढाल आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी शौचालयही नाही. मंदिराला मिळणाऱ्या या उत्पन्नातून भाविकांसाठी आवश्यक सोयी केल्या जाव्यात,अशी अपेक्षा आहे.भाविकांसाठी निवारा आवश्यकमंदिर कमिटीने यात्रा एकादशीसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. पाऊस व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून मोठे सभागृह किंवा पत्र्याचे शेड उभारणे गरजेचे आहे. मंदिर समिती पाठपुरावा करीत नाही म्हणून शासनाकडून मिळणारा तीर्थक्षेत्र विकास निधी मिळत नाही. समितीच्या या धोरणामुळे मंदिराचा विकास होत नाही. बाळू राऊत - रहिवासी पंढरपूर
नियोजनाअभावी भाविकांची गैरसोय
By admin | Published: July 11, 2014 12:48 AM