पैठण नगर पालिकेचे व्यापारी संकूल पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 07:30 PM2021-08-25T19:30:44+5:302021-08-25T19:32:41+5:30
रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन या बाबत कारवाई करण्याची विनंती केली होती.
पैठण : नाथ मंदिरालगत यात्रा मैदानासाठी आरक्षित असलेल्या ( आरक्षण क्र २९) क्षेत्रावर पैठण नगर परिषदेने बांधलेल्या व्यापारी संकुलाचे बांधकाम संपूर्ण निष्काषीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी नगर परिषद प्रशासनास दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
आरक्षीत जागेच्या १५ % क्षेत्रावर वाणिज्य विकास कामास नगर विकास विभागाने दिलेल्या परवानगीनुसार नाथ मंदीर परिसरात व्यापाऱ्यांना व्यावसायिक गाळे बांधून देण्याचा ठराव मंजूर केला. या नुसार नाथ मंदीर परिसरात व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम उभे केले. दरम्यान, याबाबत पैठण येथील रमेश लिंबोरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याबाबत कारवाई करण्याचे आदेश २०१६ मध्ये जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले होते. परंतु, याबाबत अद्याप कारवाई झाली नव्हती.
दरम्यान, रमेश लिंबोरे यांनी ३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना निवेदन देऊन याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती. या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी मुख्याधिकारी पैठण यांना आदेश दिले असून या आदेशात असे म्हटले आहे की, पैठण येथील न.भू.क्र . १०५१. १०५३. १०५४ , १०५६ व १०५७ या महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या जागेवर (आरक्षीत यात्रा मैदानावर ) नगर परिषदेमार्फत अतिक्रमण करुन , करण्यात आलेले व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्णतः निष्काषीत करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्यात यावा. या आदेशाने व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
बांधकाम नियमीत करण्याचा प्रस्ताव शासनाकडे
पैठण नगर परिषद तत्कालीन मुख्याधिकारी यांनी दि. २९ .०३.२०१७ रोजी प्रकरणाधीन व्यापारी संकुलाचे बांधकाम नियमित करण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव सादर केलेला आहे. सदर प्रस्ताव , शासन स्तरावर प्रलंबीत असून अद्याप सदर प्रस्तावास शासनाने मंजुरी प्रदान केलेली नाही. राजकारण बाजुला ठेवून या बाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा झाला असता तर नगर परिषदेच्या प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी दिली असती. मात्र पैठण तालुक्यात पेटलेल्या राजकारणात व्यापाऱ्यांना भरडले जात आहेत, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी
पैठण येथील न.भू.क्र . १०५१. १०५३. १०५४ , १०५६ व १०५७ वर नगर परिषदेने व्यापारी संकुलाचे बांधकाम करण्यात आले असे न्यायालय व जिल्हा प्रशासनास तक्रारदाराच्यावतीने सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात सदर व्यापारी संकुल या जागेवर नसून ते गावठाणात बांधण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी स्वतः स्थळ पाहणी करून नंतर व्यापारी संकुल निष्काषीत करण्याचा निर्णय घ्यावा असे आवाहन नगरसेवक दत्ता गोर्डे यांनी केले आहे. नगर परिषदेचे उत्पन्न वाढावे व व्यापाऱ्यांच्या हिताचा विचार करून हे गाळे बांधण्यात आले आहेत. प्रशासनाने विचार न केल्यास या बाबत न्यायालयात जाणार असल्याचे दत्ता गोर्डे यांनी सांगितले.