औरंगाबाद : शहरातील साचलेल्या कचर्यातून दुर्गंधी येऊ नये, तसेच कम्पोस्टिंगसाठी लागणारे रसायन खरेदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी रात्री १० वा. संपलेल्या बैठकीत दिले. पालिकेतील सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांनी मनपा अधिकार्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. २ हजार लिटर बायोकेमिकल खरेदीचे आदेश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी एन.के. राम यांनी सांगितले, यंत्र खरेदीवर जोर देण्यात सध्या वेळ घालविण्यापेक्षा शहरात कम्पोस्टिंग वाढविणे आणि साचलेल्या कचर्याबाबत निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. यंत्र खरेदीमध्ये काहीही अडचण नाही. कचरा प्रक्रियेसाठी ते घ्यावेच लागणार आहे. झोननिहाय एक यंत्र घेण्यात येणार आहे. ती खरेदी तातडीने व्हावी, यासाठी प्रयत्न आहेत. कचरा प्रक्रियेसाठी तयार केलेला डीपीआर ३ ते ४ महिन्यांत अंतिम होईल, त्याला मंजुरी देण्यात येणार आहे, तसेच ड्राय वेस्ट (सुका कचरा) झोननिहाय संकलन होणार आहे. त्यासाठी रॅकची संख्या वाढविण्याबाबत विचार केला आहे.
मध्यवर्ती जकात नाका येथे मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. शहरातील साचलेला कचरा उचलण्याला प्राधान्य, बायोकल्चर आणि कंपोस्टिंग पिटवर भर देणार, रात्रपाळीत कचरा उचलणार, वार्डातच कचर्यावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य देण्याचे बैठकीत ठरले. शहरातील कचर्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. बायोकल्चर आणि कंपोस्टिंग पीटद्वारे प्रक्रिया करण्यासाठी पालिकेतील कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी कचरा जमा होतो, तो कचरा उचलण्यासाठी रात्रपाळीतदेखील कचरा उचलण्यात येणार असून, या सर्व प्रक्रियेमध्ये शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. या बैठकीला नगरविकास विभागाचे उपसचिव सुधाकर बोबडे, मनपाचे वॉर्ड अधिकारी उपस्थित होते.
काही सिमेंट कंपन्या संपर्कातकचर्यातून अॅश (राख) निर्मिती करण्यासाठी काही सिमेंट कंपन्यांनी प्राथमिक पातळीवर जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली आहे. एक ते दोन कंपन्यांचे प्रतिनिधी या आठवड्यात जिल्हाधिकार्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे वृत्त आहे. कम्पोस्टिंग अथवा अॅशनिर्मितीसाठी चर्चा करतील. दरम्यान, जिल्हाधिकारी म्हणाले, काही सिमेंट कंपन्या संपर्कात आल्या आहेत, अजून त्यांच्याशी चर्चा झालेली नाही.