जालना : राज्यस्तरावरील एका विशेष आरोग्य पथकाने जिल्हा रुग्णालयातील रुग्ण सुविधा, स्वच्छता तसेच जैविक कचऱ्याची विल्हेवाट आदींची कसून तपासणी केली.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी व स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरातील जिल्हा रुग्णालय तसेच आरोग्य केंद्रांना रोख रकमेचा कायाकल्प पुरस्कार व सुविधांसाठी केंद्राचा निधीही देण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून राज्यस्तरीय विशेष पथकाने जिल्हा रुग्णालयाची विविध विभागांची सोमवारी दिवसभर कसून तपासणी केली. या पथकाने अपघात विभागसह इतर विभागातील वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सूचनाही दिल्या.सोमवारी सकाळीच सात सदस्यीय पथक रुग्णालयात दाखल झाले. या पथकाने ४० पेक्षा अधिक विभागांची तपासणी केली. यात असलेल्या त्रुटी, करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. अपघात विभागातील रुग्णांची विचारपूस करण्यात येऊन जखम झाल्याची पट्टी कशी केली जाते याची विचारणा केली. संबंधितांना सूचनाही केल्या. एका औषधी बाबतही विभागातील परिचारिकांना प्रश्नोत्तरे केली. केंद्र शासनाच्या या पुरस्कारासाठी रुग्णालयाने कोणते मापदंड पाळावेत अथवा त्यात काय सुधाराणा करावे याची तपासणी यात झाली. यात प्रामुख्याने रुग्णालयातील स्वच्छता, तेथील कचऱ्याची विल्हेवाट व व्यवस्थापन, रोग तसेच संसर्ग संक्रमण होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी यात महत्वाचा मुद्दा आहे. पुरस्कार निकषासाठी ५०० गुण आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील म्हणाल्या, सोमवारी सकाळी सात सदस्य राज्यस्तरीय पथकाने रुग्णालाची तपासणी केली. कायाकल्प पुरस्कारासाठी ही तपासणी झाली. तीन प्रकरच्या टप्प्यातून ही माहिती संकलित करण्यात आली. विजेत्या जिल्हा रुग्णालयात रोख पुरस्कार व केंद्राचा विशेष निधीही मिळणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा रुग्णालयाची पथकाकडून तपासणी
By admin | Published: September 14, 2015 11:36 PM