दिवाळीत मी गोडधोड खाणार... या फासेपारधी मुलांचे काय?
By गजानन दिवाण | Published: October 25, 2018 02:22 PM2018-10-25T14:22:00+5:302018-10-25T14:25:34+5:30
‘यांचीही दिवाळी गोड करा’ उपक्रमाबाबत मैत्र मांदियाळीचे अजय किंगरे यांची विशेष मुलाखत
- गजानन दिवाण
तसे पाहिले तर दिवाळी पूर्वीसारखी हवीहवीसी राहिली नाही. घरात रोज गोडधोड होते. हवे त्यावेळी कपडेलत्ते मिळतात. वाटेल त्यावेळी भेटीगाठीही होतात. मग दिवाळीचे वेगळेपण काय? तरी आम्ही अगदी दणक्यात दिवाळी साजरी करतो. तशी ती यावर्षीही करू. ऐपतीप्रमाणे खरेदीही करू. पण, ज्यांची रोज भाजी-भाकरी खाण्याची मारामार त्यांच्या दिवाळीचे काय?
या विचाराने अस्वस्थ झालेले जालन्यातील ‘मैत्र मांदियाळी ग्रुप’चे अजय किंगरे यांनी ‘यांचीही दिवाळी गोड करा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत.
नेमका काय आहे हा उपक्रम?
- प्रत्येकजण आपापल्या ऐपतीनुसार दिवाळी साजरी करेल. पण ज्यांची काहीच ऐपत नाही अशांचे काय, या विचारातूनच हा उपक्रम जन्माला आला. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहोत. प्रत्येक मुलाला ३०० रुपये लागतात. दरवर्षी साधारण एक ते दीड लाख रूपये खर्च येतो. या मुलांना दिवाळीत करंजीपासून चकलीपर्यंत सर्व फराळ दिला जातो.
कोण आहेत ही मुले?
- अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे मतीन भोसले यांनी फासेपारधी मुलांची ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी शाळा सुरू केली आहे. साडेचारशे मुलांचा हा संसार आहे. महिन्याला किमान एक लाख रूपयांचा किराणा लागतो त्यांना. कुठलेही अनुदान नसताना त्यांची जगण्याची कसरत सुरू आहे. दररोज खाण्याची मारामार असलेल्या या मुलांची दिवाळी कशी असेल? या सर्व मुलांना आम्ही हा फराळ देतो. याशिवाय जालन्यातील १२४ एडस्ग्रस्त मुलांनाही दिवाळी फराळ देतो.
‘प्रश्नचिन्ह’ला तुम्ही किराणा देखील भरुन देता...
- होय. गेल्या काही वर्षांपासून दर महिन्याला आम्ही त्यांना किराणा भरुन देतो. तेल-मीठापासून अगदी शाम्पूपर्यंत सामान त्यांना पाठविले जाते. गेल्या काही महिन्यांत त्यांना मिळणारी मदत काहीसी वाढल्याने आता दर महिन्याला किराणा पाठवावा लागत नाही. पण, गरज भासली की आम्ही पाठवतो.
यासाठी पैसा?
- मैत्र मांदियाळी ग्रुपमध्ये राज्यभरातून १२५ सदस्य आहेत. आम्ही सर्वजण महिन्याला २०० रुपये जमा करतो. शिवाय औरंगाबाद, जालना जिल्ह्यात काही दुकानांमध्ये मदतीसाठी बॉक्स ठेवले आहेत. ‘एक दिवस दत्तक’ या योजनेत काही लोक मदत करीत असतात. अशा माध्यमातून पैसा जमतो. वेळ लागतो. पण, कमी नाही पडत.
फराळाशिवाय काही देता का?
- मागच्यावर्षी एका विदेशी नागरिकाने ५५ हजारांची मदत दिली. सर्व मुलांना फराळ दिल्यानंतरही पैसे वाचले. मग ‘प्रश्नचिन्ह’च्या ४५० मुलांना कपडेही घेतले.
आपला शैक्षणिक पालकत्व हा उपक्रम काय आहे?
- आम्ही जवळपास ३५ मुले या उपक्रमांतर्गत दत्तक घेतले आहेत. यावर महिन्याला साधारण ५० हजार रुपये खर्च होतात. हुशार आहेत, पण गरीबीमुळे पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना या उपक्रमांतर्गत मदत केली जाते. विदर्भातील दोन मुलांनाही याअंतर्गत मदत केली आहे. या उपक्रमातील एक विद्यार्थी लवकरच पीएसआय होण्याच्या मार्गावर आहे. हेच आमचे मोठे यश आहे.
‘मी आणि माझे’ असा विचार मोठ्या प्रमाणात होत असताना हे सारे कसे जमते?
- यासाठी वेगळे काही करावे लागत नाही. उघड्या डोळ्याने आणि खुल्या मनाने आजूबाजूला पाहिले की ते आपोआप घडते. कोणीतरीकशाच्या तरी माध्यमातून सुरूवात करतो आणि ती चळवळ बनते. ‘मैत्र मांदियाळी’चेही असेच आहे.
अजय किंगरे यांचा संपर्क : ajaykingre@gmail.com