अंदमान-निकोबार येथील काड्यांच्या अक्षरातून साकारतेय ‘ज्ञानेश्वरी’

By Admin | Published: October 12, 2016 12:54 AM2016-10-12T00:54:53+5:302016-10-12T01:12:28+5:30

प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेच्या मूळ श्लोकावरून निरुपणाच्या ओवी मराठीतून लिहून ज्ञानेश्वरीद्वारे सर्वसामान्यांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले.

'Dnyaneshwari', which forms from the letters of the cartons in Andaman and Nicobar | अंदमान-निकोबार येथील काड्यांच्या अक्षरातून साकारतेय ‘ज्ञानेश्वरी’

अंदमान-निकोबार येथील काड्यांच्या अक्षरातून साकारतेय ‘ज्ञानेश्वरी’

googlenewsNext


प्रशांत तेलवाडकर , औरंगाबाद
संत ज्ञानेश्वरांनी भगवतगीतेच्या मूळ श्लोकावरून निरुपणाच्या ओवी मराठीतून लिहून ज्ञानेश्वरीद्वारे सर्वसामान्यांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडले. या ज्ञानेश्वरीला ७२५ वर्षे झाली, पण आजही त्यातील तत्त्वे जीवन कसे जगावे यासाठी प्रेरणादायी ठरत आहेत. ज्ञानेश्वरीने प्रभावित झालेल्या औरंगाबादेतील हस्तकलाकार राजेश सोहिंदा यांनी काड्यांना अक्षरांचा आकार देऊन ज्ञानेश्वरी लिहिण्यास घेतली आहे. त्यांनी पहिला अध्याय पूर्ण केला आहे. येत्या ५ वर्षांत संपूर्ण ज्ञानेश्वरी साकारण्याचा त्यांचा मानस आहे.
ज्ञानेश्वरी ग्रंथाची साक्षात भगवंताचा विग्रह या रुपाने पूजा केली जाते. आजपर्यंत कोट्यवधी लोकांनी ज्ञानेश्वरीतील दिव्य प्रकाशाच्या साह्याने आपल्या कर्तव्याचा मार्ग निश्चित करून आत्मकल्याण साधले आहे. आजही अनेक व्यक्ती, धार्मिक संस्था ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. अनेक प्रकाशकांनी विविध रुपाने या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. ज्ञानेश्वरी आता ई-पुस्तकातही वाचण्यास मिळत आहे. लहान-थोरांमध्ये ज्ञानेश्वरी वाचण्याची आवड निर्माण व्हावी व केन कलेला जागतिक पातळीवर पोहोचविण्यासाठी शहरातील हस्तकलाकार राजेश सोहिंदा यांनी केनच्या साह्याने ज्ञानेश्वरी लिहिण्याचा संकल्प केला आहे. काड्यांना अक्षरासारखे वळवत त्यांनी नुकताच ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय पूर्ण केला असून, दुसरा अध्याय पूर्णत्वाकडे आहे. पहिल्या अध्यायात ४७ श्लोक व २७५ ओव्या आहेत. ६३ वर्षीय सोहिंदा गेल्या ४५ वर्षांपासून केनच्या साह्याने शुभेच्छापत्रे तयार करीत आहेत. काडी हातात घेताच त्यांचे जादुई बोट एवढे सफाईदारपणे काम करतात की, लवचिक काड्या अक्षराचे रूप धारण करतात.
सोहिंदा यांनी सांगितले की, भगवतगीतेतील १८ अध्यायांवर ज्ञानेश्वरी आधारित आहे. ७०० श्लोक व त्यात ९०३१ ओव्या आहेत. प्रत्येक ओवी साडेतीन चरणांची आहे. सुमारे १० लाख ५१ हजार ५२० शब्द व त्यात ३२ लाख ५१ हजार ५२० अक्षरे आहेत. एक ओवी लिहिण्यासाठी ८ तासांचा कालावधी लागतो. याच गतीने लिखाण केले तर येत्या ५ वर्षांत संपूर्ण ज्ञानेश्वरी काड्यांच्या अक्षरातून साकारली जाईल.
शेंदुरी, लाल रंगाच्या हँडमेड कागदाची १८ बाय दीड इंचाच्या पट्टीवर काड्यांचे अक्षर चिटकवून ओवी लिहिल्या जात आहे. याकामी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासिका डॉ.कुमुद गोसावी व सुधा कुंटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
काड्यांना अक्षरात साकारणे ही कला काही सोपी नव्हे. ज्ञानेश्वरी साकारताना सोहिंदा यांचे मागील ४५ वर्षांतील कौशल्यपणाला लागले आहे. त्यांनी सांगितले की, जे अक्षर गोल, अर्ध्या इंचापेक्षा छोटे असतात. काडीच्या साह्याने ते अक्षर साकारणे कठीण जाते. यात म, भ, ळ, ध हे अक्षर साकारणे कठीण असते. अनेकदा गोल आकार देताना लवचिक काड्याही तुटतात. पण मागील साडेचार दशकांतील अनुभव मला कामी येत आहे.


सोहिंदा यांनी २००९ मध्ये ज्ञानेश्वरी साकारण्यास सुरुवात केली, पण २०१० मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला. मात्र, केनच्या काड्यांतून ज्ञानेश्वरी साकारण्याच्या त्यांच्या प्रबळ इच्छेने त्यांनी मागील ५ वर्षांत अर्धांगवायूवरही मात केली. ज्ञानेश्वरी साकारण्यात त्यांची ब्रह्मानंदी टाळी लागते एवढे देहभान विसरून ते काम करीत आहेत. माझी कला व ज्ञानेश्वरीच माझ्यासाठी ‘औषध’ बनली, असेही ते सांगतात.
राजेश सोहिंदा यांनी सांगितले की, काड्यांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याचा हा जगातील पहिलाच प्रयत्न आहे. पहिला अध्याय पूर्ण झाला असून, गिनीज बुकात नोंद करण्यासाठी व हस्तकलेत औरंगाबादचे नाव जगात पोहोचविण्यासाठी या कलेची नोंद गिनीज बुकात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर कुराणातील आयते लिहिण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Dnyaneshwari', which forms from the letters of the cartons in Andaman and Nicobar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.