शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:56 PM2018-12-26T23:56:36+5:302018-12-26T23:57:16+5:30

जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे.

Do not break the city's water supply | शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नका

googlenewsNext
ठळक मुद्देमनपाची विनंती : जलसंपदा विभागाला पत्र

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाणी घेत आहे. मागील पाच वर्षांपासून मनपाने जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टीच भरली नाही. पाणीपट्टीच्या थकबाकीचा आकडा आता ११ कोटींपर्यंत पोहोचला आहे. गुरुवार, २७ डिसेंबरपासून हळूहळू पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा मागील आठवड्यातच जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. कारवाई टाळण्यासाठी मनपा प्रशासनाने जलसंपदा विभागाला थकबाकी भरण्याची कारवाई सुरू असल्याचे कळविले आहे. या पत्रावर जलसंपदा विभागाचे समाधान न झाल्यास गुरुवारी दोन तास पाणी उपसा थांबविण्यात येईल.
जायकवाडी धरणातून दररोज १५० एमएलडी पाणी मनपा घेत आहे. मनपाने जेवढे पाणी घेतले, तेवढ्या पाण्याची पाणीपट्टीही पाटबंधारे विभागाला भरणे आवश्यक आहे. महिन्याला सुमारे १८ ते २० लाख रुपये पाणीपट्टी आकारण्यात येते. दरमहा ही रक्कम पाटबंधारे विभागाकडे भरणे अभिप्रेत आहे; मात्र मागील ५ वर्षांपासून पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने यासंबंधीची संचिका लेखा विभागाकडे पाठविली आहे. अद्यापही लेखा विभागाकडून ही रक्कम अदा केली नाही. पाटबंधारे विभागाने पालिकेला २०१५ पासून तब्बल १७ नोटिसा पाठवून पाणीपट्टी भरण्यास सांगितले. शेवटी पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर २०१८ पर्यंत १० कोटी ६८ लाख ६० हजार रुपये पाणीपट्टीपोटी भरावेत, अशी नोटीस १३ डिसेंबर रोजी मनपाला बजावली आहे. पाणीपट्टी तात्काळ अदा न केल्यास २७ डिसेंबरपासून पाणी कपात करण्यास सुरुवात केली जाईल. ३१ डिसेंबरला पूर्ण पाणी उपसाच बंद करण्यात येईल, असेही नोटीसमध्ये नमूद केले आहे. पाण्याचा उपसा बंद केल्यानंतर शहरवासीयांची जी गैरसोय होणार आहे, त्यास पूर्णत: पालिका जबाबदार राहील, असेही कळविण्यात आले आहे.

समांतरच्या कंपनीची थकबाकी
जलसंपदा खात्याने मनपाला पाणीपट्टी शुल्काची नोटीस बजावली आहे; परंतु यातील ६ कोटी रुपयांची थकबाकी ही समांतरच्या ठेकेदार कंपनीच्या काळातील आहे. मनपाने १ सप्टेंबर २०१४ पासून शहराची पाणीपुरवठा योजना औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे सोपविलेली होती. पुढे दोन वर्षे म्हणजे १ आॅक्टोबर २०१६ पर्यंत हे काम कंपनीकडे होते. या काळात कंपनीने जलसंपदाकडे पाणीपट्टीचे शुल्क भरलेच नाही, त्यामुळे आता मनपाकडील थकबाकीची रक्कम अधिक दिसत असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी नमूद केले.

पाणी कपातीचा कार्यक्रम
२७ डिसेंबर- जायकवाडीत पाण्याचा उपसा दोन तास बंद केला जाईल.
२८ डिसेंबर- चार तासांसाठी उपसा बंद केला जाणार आहे.
२९ डिसेंबर - सहा तास उपसा बंद राहील.
३० डिसेंबर- आठ तास पाण्याचा उपसा बंद राहील.
३१ डिसेंबर -पाणी उपसा पूर्णत: बंद केला जाईल.

Web Title: Do not break the city's water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.