घाटीतील डॉक्टरांनी केले दोघांना चालण्यासाठी सक्षम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 08:17 PM2018-12-20T20:17:51+5:302018-12-20T22:19:04+5:30
घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभाग आणि उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाने (सीव्हीटीएस) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघांना चालण्यासाठी सक्षम केले.
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया : ६७ वर्षीय महिलेवर कृत्रिम सांधेरोपण, बायपास शस्त्रक्रियेने एकाचा वाचविला पाय
औरंगाबाद : घाटीतील अस्थिव्यंगोपचार विभाग आणि उरोशल्य चिकित्सा आणि हृदयरोग अतिचिकित्सा विभागाने (सीव्हीटीएस) गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून दोघांना चालण्यासाठी सक्षम केले. यात अस्थिव्यंगोपचार विभागात एका ६७ वर्षीय महिलेवर संपूर्ण कृत्रिम सांधेरोपण केले. तर गँगरीन झालेल्या एका पुरुषावर पायाची बायपास शस्त्रक्रिया करून त्याचा पाय वाचविण्याची किमया ‘सीव्हीटीएस’ विभागातील डॉक्टरांनी साधली आहे.
आशा रमेशराव जाचक (रा.रामनगर) असे सांधरोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रफुल्ल पटेल (५७,रा. एन-७ हडको) असे पाय वाचविलेल्या रुग्णाचे नाव आहे. आशा जाचक या दोन वर्षांपासून गुडघेदुखीने त्रस्त होत्या. त्यांनी राज्य कामगार रुग्णालयात दाखवले. तेव्हा त्यांनी घाटीत रेफर करण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी गुडघ्याचे कृत्रीम प्रत्यारोपण करण्याचे निदान केले. कुटुुुंबियांनी होकार दिल्यानंतर कृत्रीम गुडघा मागवण्यात आला. त्यानंतर अस्थिव्यंगोपचार विभागाचे पथक प्रमुख डॉ. मुक्तदिर अन्सारी, डॉ. अलफ पठाण, डॉ. अमोल भगस, डॉ. मिलींद लोखंडे, डॉ. श्रेयश घोटावडेकर,ी बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. राजश्री सोनवणे, डॉ. सुचिता जोशी यांनी शनिवारी अडीच तास चाललेल्या शस्त्रक्रियेत सांध्याचे प्रत्यारोपण यशस्वी केले. नर्सींग होमच्या इंचार्ज एंगल्स सिस्टर, महेश पाठक यांचे सहकार्य मिळाले.
मधुमेहामुळे प्रफुल्ल पटेल यांच्या उजव्या पायाला गँगरिन झाला होता. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांनी पाय कापावा लागेल असे सांगितले होते. परंतु सीव्हीटीएस विभागातील डॉक्टरांनी दीड महिन्यापूर्वी त्यांच्या पायाची बायपास शस्त्रक्रिया केली. डाव्या पायातून उजव्या पायात कृत्रिम रक्तवाहिनी जोडण्यात आली. पाच तास चालेल्या रक्तवाहिनीच्या या बायपास शस्त्रक्रियेमुळे त्याचा पाय वाचला. हृदयरोग, रक्तवाहिन्या शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत मोरे, डॉ. सुचिता जोशी, डॉ. बीडकर यांच्यासह परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी शस्त्रक्रियेसाठी प्रयत्न केले.
चौथ्या दिवशी चालू लागल्या
चौथ्यादिवशी आशा जाचक या वॉकरच्या मदतीने चालु लागल्या. ‘टोटल नी रिप्लेसमेंट’च्या शस्त्रक्रियेला खाजगीत लाखांत खर्च येतो. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, उपधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत थोरात यांच्या मार्गदर्शनात घाटीत शस्त्रक्रीया मोफत झाली. आरोग्य योजनेतही लवकरच होईल, असे डॉ. मुक्तदिर अन्सारी म्हणाले.
महिनाभरानंतर चालत आले
गँगरीनमुळे प्रफुल पटेल यांना चालनेही शक्य होत नसे. शस्त्रक्रि येच्या महिनाभरानंतर ते गुरुवारी सीव्हीटीएस विभागात स्वत: चालत आले. शस्त्रक्रियेसाठी अधिष्ठातांसह सर्व वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाल्याचे डॉ. प्रशांत मोरे यांनी सांगितले.