औरंगाबाद : राज्याच्या ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी रविवारी महावितरण व महापारेषणच्या विविध विकासकामांची पाहणी केली. यामध्ये त्यांनी शेंद्रा येथे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत सुभाष कचकुरे यांच्या शेतात बसविण्यात आलेल्या सौर कृषिपंपाची पाहणी केली. ढगाळ वातावरणात, पाऊस सुरू असतानाही सौरपंप काम करतो का, हे त्यांनी प्राधान्याने जाणून घेतले.
शेंद्रा एमआयडीसी उपकेंद्रातील उपलब्ध जागेवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचीही वाघमारे यांनी पाहणी केली. या प्रकल्पातून कमी दरात, किती वीज निर्मिती होते आणि सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यापासून किती वीज निर्मिती झाली, हे त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले. शेकटा येथील उच्चदाब वितरणप्रणाली योजनेचे लाभार्थी ग्राहक त्रिंबक घोडके यांच्या शेतातील वीज जोडणीची पाहणीही वाघमारे यांनी केली. यापूर्वी एकाच रोहित्रावर अनेक जोडण्या असल्याने वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन रोहित्र नादुरुस्त होत असे. आता एका रोहित्रावर माझी एकट्याचीच वीजजोडणी असल्याने रोहित्र बिघाडाची काळजी मिटली आहे, असे त्रिंबक घोडके यांनी सांगितले.
यावेळी महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, महापारेषणचे मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, औरंगाबाद ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, कार्यकारी अभियंता विष्णू ढाकणे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दीपक माने, उपकार्यकारी अभियंता सुनील शिंदे, सहायक अभियंता मनीष मगर, मनीष डिघुळे, बाळासाहेब बर्वे, योगेश चेंडके यांच्यासह महावितरण, महापारेषणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
एकतुनी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारा
दरम्यान, दिनेश वाघमारे यांनी दोनदिवसीय औरंगाबाद दौऱ्यात शनिवारी पारेषण कंपनीच्या एकतुनी येथील ७६५ केव्ही उपकेंद्रास भेट देऊन तेथील संचलन व सुव्यवस्थेची माहिती घेतली, तसेच उपकेंद्राशेजारी रिक्त जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची सूचना केली.
---
फोटो ओळ..
ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी शेकटा येथील उच्चदाब वितरणप्रणाली योजनेचे लाभार्थी ग्राहक त्रिंबक घोडके यांच्या शेतातील वीजजोडणीची पाहणी केली. यावेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले, मुख्य अभियंता भुजंग खंदारे, मुख्य अभियंता श्रीराम भोपळे, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली आदी.