औरंगाबाद: जिल्ह्यातील पदवीधर असलेले वृध्द आणि अपंग मतदारांना त्यांच्या घरीच गोपनीयतेने पदवीधर मतदारसंघासाठी मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आधारे करून देण्यात आली आहे. नायब तहसीलदारांसह कर्मचारी वृध्दांच्या घरी जाणार असून, त्यासाठी संबंधित मतदारांना संदेश देण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांनी दिली.
उपजिल्हाधिकारी वैद्य यांनी सांगितले, टपाली मतदारांसाठी मंगळवारी मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत. मंगळवारी ९० मतपत्रिका दिल्या असून, मतदानाच्या दिवसापर्यंत त्यांना मतपत्रिका पाठविण्याची मुदत आहे. सोबतच जिल्ह्यात ८० वर्षांवरील जे मतदार आहेत. त्यांचा आकडा ९० च्या आसपास आहे. इतकेच दिव्यांग मतदार आहेत. त्यांना देखील मतदान केंद्र आपल्या घरी या धर्तीवर मतदान करण्यासाठी जागृत करण्यात आले आहे. त्यांच्यापर्यंत प्रशासकीय यंत्रणा जाईल. हे मतदान यंत्रणा आयोगाच्या सूचनेप्रमाणे करून घेणार आहे. यासाठी कॅमेरामन, कर्मचारी, मतपत्रिका सील करण्याची पूर्ण व्यवस्था असणार आहे. हे मतदान करून घेतले जाणार असल्याची माहिती सर्व ३५ उमेदवारांना देण्यात आली आहे. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी प्रशासकीय पातळीवर सर्व यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात आले आहे.
टपाली मतदानासाठी तयारी
टपाली मतदान करून घेण्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. पात्र मतदारांना मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय पत्रिकांचे वाटप होत आहे, असेही उपजिल्हाधिकारी वैद्य यांनी सांगितले.