घरा-घरात लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार; इंटरनेट सुविधा घेऊन आला बीएसएनएल फोन
By साहेबराव हिवराळे | Published: October 6, 2023 06:54 PM2023-10-06T18:54:24+5:302023-10-06T18:54:56+5:30
पुन्हा कात टाकण्याचे बीएसएनएलचे प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : अनेक घरांत शोपीससारखे पडलेले जुने लँडलाइन फोन पुन्हा खणखणणार आहेत. पुन्हा कात टाकण्याचे बीएसएनएलचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. फायबर कनेक्शन जोडणीतून मनसोक्त बोलता येईल. ओटीटीवर चित्रपटासह टीव्ही पाहता येईल. डाटा, इंटरनेट सुविधा घेऊन बीएसएनल फोन नव्या रुपड्यात येत आहे.
खासगी कंपन्यांच्या गतिमान कारभाराच्या स्पर्धेत बीएसएनएल गुदमरले होते. कारभार अधिक गतिमान करण्यासाठी आऊटसोर्सिंग यंत्रणेला ग्राहक सेवा केंद्र देण्यात आले आहे. पूर्वी कर्मचारी संख्या घटल्याने बीएसएनएलची नेटवर्क सेवा कमी पडत होती. आता शासनाने बीएसएनएलची यंत्रणा गतिमान केली असून, ४ जी, ५ जी देण्यावर भर दिलेला आहे.
छत्रपती संभाजीनगरात १० हजारांवर जोडण्या घेण्यात आलेल्या आहेत. वायफाय, इंटरनेट डाटा, ओटीटीवर टीव्ही, सिनेमा, मालिका, यू-ट्यूबवरील व्हिडिओ देखील पाहता येतील. फोनवर अमर्याद कॉलिंग सेवा अशा योजनांसह घरातील टेलिफोन खणखणणार आहे.
२६ ग्राहक सेवा केंद्रांवर ही सेवा सुरू...
जुन्या बंद पडलेल्या फोनचे पुनरुज्जीवन करता येईल. नेटवर्क गतिमान झाल्याने घरातील फोनसह साधारण पाच मोबाइलच्या जोडण्यांचा लाभ घेता येणार आहे. घरातील कुुटुंबात इंटरनेटचा वापर वाढत आहे. अभ्यास असो की मनोरंजन वा व्यवसाय; सर्वांसाठीच फोनचा उपयोग सुरू आहे. बीएसएसएलच्या भारत नेटवर्कचा कारभार सर्वांनाच सोयीचा ठरणार आहे. आधारकार्डसह इतर सेवांचा जनतेने लाभ घ्यावा.
- संजयकुमार केशरवानी, जी.एम. बीएसएनएल