संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:52 PM2018-10-25T12:52:29+5:302018-10-25T12:52:39+5:30

आज सकाळी १० वाजता ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश महापौरांनी दिले.

Drainage inundated water for six months in Sanjaynagar | संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी

संजयनगरात सहा महिन्यांपासून वाहतेय ड्रेनेजचे दुषित पाणी

googlenewsNext

औरंगाबाद : संजयनगर बायजीपुरा येथील गल्ली नं. २१ मध्ये मागील सहा महिन्यांपासून ड्रेनेजचे दूषित पाणी वाहत आहे. शंभर वेळेस नागरिकांनी मनपा प्रशासन, तीन लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली; मात्र कोणीच दखल घ्यायला तयार नाही. दुर्गंधीमुळे लहान मुले आजारी पडू लागल्याने बुधवारी संतप्त नागरिकांनी महापालिकेत येऊन महापौर नंदकुमार घोडेले यांना घेराव घातला. गुरुवारी सकाळी १० वाजता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

संजयनगर भागातील सर्वात मोठी गल्ली म्हणजे २१ नंबर होय. अर्ध्या किलोमीटर लांब गल्लीतील किमान २०० पेक्षा अधिक घरांना या दूषित पाण्यामुळे नरकयातना सहन कराव्या लागत होत्या. ड्रेनेजलाईन चोकअप होताच संबंधित वॉर्ड कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना तक्रार देण्यात आली. चतुर अधिकाऱ्यांनीही दुरुस्तीसाठी निविदा काढली. आजपर्यंत ही निविदा मंजूर झालेली नाही. या भागातील तीन नगरसेवकांच्या हद्दीला लागून या गल्लीचा समावेश होतो. त्यामुळे तिन्ही लोकप्रतिनिधी आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, असा आरोप बुधवारी शिष्टमंडळाने महापौरांसमोर केला.

या भागातील सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल बोरगावकर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाची संपूर्ण माहिती महापौरांना दिली. महापौर घोडेले यांनी कार्यकारी अभियंता अफसर सिद्दीकी यांना बोलावून आणीबाणी कायद्यांतर्गत गुरुवारी सकाळीच १० वाजता कामाला सुरुवात करा, असे आदेश दिले. या कामाला नंतर आयुक्त मंजुरी देतील, असेही  त्यांनी सांगितले. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने यापूर्वीच काम करायला हवे होते, असेही महापौरांनी सांगितले. 

रस्ता खोदावा लागणार
महापालिकेने गल्ली नं. २१ येथे अलीकडेच सिमेंटचा गुळगुळीत रस्ता केला आहे. ड्रेनेजलाईनच्या दुरुस्तीसाठी हा रस्ता खोदण्याची नामुष्की मनपावर ओढावली आहे. सिमेंट रस्ते तयार करण्यापूर्वीच मनपाने जलवाहिन्या, ड्रेनेजलाईन बाजूला का केल्या नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

Web Title: Drainage inundated water for six months in Sanjaynagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.