गंगापूर : गंगापूर पंचायत समिती आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे गंगापूर तालुक्यातील १६ घरकुल लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे. त्यामुळे आता दाद कुणाकडे मागावी अशी अवस्था लाभार्थ्यांची झाली आहे.गंगापूर पं.स. तील इंदिरा आवास घरकुल योजनेमध्ये घरकुल मंजूर झाल्यानंतर आॅनलाइन यादी मधून १६ लाभार्थी डावलण्यात आले आहे. घरकुल मिळवण्यासाठी खर्च करूनही लाभ मिळत नसल्याने लाभधारक अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी घरकुल लाभधारकांनी केली आहे. २०१५/१६ मध्ये गंगापुर पंचायत समितिमध्ये इंदिरा आवास घरकुल योजनेमध्ये ५२१ घरकुल मंजूर झाले आहेत. ३१ मार्च २०१६ पर्यंत मंजुर झालेली व प्रशासकीय मंजूरी दिलेली सर्व प्रकरणे आॅनलाइन करुन घ्यावी, असे आदेश देण्यात आले होते. यातील १६ प्रकरणे आॅनलाइन केलेच नाही. गंगापूर तालुक्यातील मालनबाई काकडे- भागाठान, भीमा तुपलोंढे-जामगाव, भाऊसाहेब देवबोने-वडगावटोकी, हरिभाऊ शिंदे-मांडवा, मुक्ताजी कांबळे-ढोरेगाव, सुनीता बोरडे वसंत बन्सी-दिघी, शिवाजी डोळस-कनकोरी, रामनाथ भगवत-रांजनगाव नरहरी, किसन घटोळे-रांजनगाव शेनपुंजी, एकनाथ बोरुडे-सावखेडा, आसाराम तोडकर-तळपिंप्री, भीमा सोनवणे-शहापुर-गोळेगाव, राजू जाधव, रावसाहेब जाधव-अमलनेर, अब्दुल पठाण-पांढरओहळ या गावातील लाभार्थ्यांना घरकुलांची कामे सुरु करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र १६ गावातील घरकुल केवळ आॅनलाइन न केल्याने त्या लाभार्थ्यांना आपल्या घरकुलाचे काम सुरु करता आले नाही. आपल्याला घरकुल मिळणारच म्हणून काही लाभार्थ्यांनी आपले तोडके मोडके छप्पर वजा घर मोडून त्या ठिकाणी नविन घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध केली होती. शिवाय यासाठी कार्यालयीन प्रक्रिया पार पाडण्यासाठी मेहनत घेतली होती. मात्र ही सर्व मेहनत आता वाया गेली आहे.
घरकुल लाभार्थ्यांचे स्वप्न भंगले
By admin | Published: October 12, 2016 12:50 AM