वाळूज महानगर : उत्पादन शुल्क अधिकाºयाला ढाबाचालक व त्याच्या भावाने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी तीसगावच्या लालाजी ढाब्यावर घडली. या प्रकरणी जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल व विजेंद्र जैस्वाल याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ड्राय डे’ ठेवण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मोहन मातकर (४५) व जवान युवराज गुंजाळ हे सोमवारी गस्तीवर होते. त्यांना तीसगाव शिवारातील खवड्या डोंगरालगत हॉटेल लालाजीस ढाबा येथे अवैध दारुची विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर निरीक्षक मातकर यांनी पथकासह ढाब्याची पाहणी केली. त्यांनी ढाब्याची तपासणी करण्याबाबत सांगितले. तपासणीस विरोध करीत प्रभुलाल जैस्वाल व विजेंद्र जैस्वाल यांनी त्यांना मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मातकर यांनी वरिष्ठाना माहिती देत वाळूज एमआयडीसी पोलिसांना कळविले.
विभागीय व जिल्हा भरारी पथकाने ढाब्याची झडती घेतली. तेथे दोन बॉक्समध्ये सीलबंद ९६ देशी दारुच्या बाटल्या मिळून आल्या. सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात जितेंद्र प्रभुलाल जैस्वाल (३९) व विजेंद्र प्रभुलाल जैस्वाल (३७) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी तपासणीसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाºयाला राजेंद्र जैस्वाल व त्याच्या सहकाऱ्यांनी उत्पादनक शुल्क विभागाच्या अधिकाºयांना मारहाण केल्याचे समजते.