छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर १०० ते १५० कि.मी. वाहन चालविल्यानंतर चालकाला ‘डुलकी’ लागते. कारण हा रस्ता एकसरळ आहे. कुठेही वळण नाही. त्यामुळे हमखास ‘डुलकी’ लागतेच. त्यामुळे समृद्धी महामार्गावर नागपूर ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते मुंबई या दोन्हीदरम्यान चालकांसाठी शासनाने प्रत्येकी १५ मिनिटांची विश्रांती (ब्रेक) बंधनकारक केली पाहिजे, अशी सूचना या महामार्गावरून दर १५ दिवसाला प्रवास करणारे यवतमाळ शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ. नितीन भस्मे यांनी मांडली आहे.
यवतमाळहून डाॅ. भस्मे हे दर १५ दिवसाला समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरला ये-जा करतात. या महामार्गावरून वाहन चालविताना येणारा अनुभव आणि चालकांनी कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. या रस्त्यावरून धावणारी वाहने स्थितीतच पाहिजेत. प्रवासापूर्वी प्राधान्याने टायरमधील हवेचे प्रेशर आणि कुलंट तपासले पाहिजे. टायरमध्ये नायट्रोजन भरावे. त्यामुळे टायरचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे भस्मे म्हणाले. लेन बदलणे फायदेशीर हा महामार्ग सरळ आहे. इतर रस्त्यांप्रमाणे वळण नाही. चारचाकी चालविताना नजर सतत समोर राहते. त्यामुळे २० ते २५ कि.मी. अंतरानंतर सुरक्षितपणे लेन चेंज केली पाहिजे. त्यातून सतर्कता वाढण्यास मदत होते, असे भस्मे म्हणाले.
‘डुलकी’ टाळण्यासाठी काच उघडाडाॅ. भस्मे म्हणाले, हा रस्ता जागतिक दर्जाचा आहे. त्यावरून प्रवास करताना अर्धा वेळ वाचत आहे. एकदा मलाही डुलकी लागली आणि अपघात होताहोता टळला. एसी सुरू ठेवून वाहन चालविले जाते. शिवाय जेवणही झालेले असते. अशा परिस्थितीत डुलकी लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे २ ते ४ मिनिटांसाठी चारचाकीची काच उघडून बाहेरची हवा घेतली पाहिजे. थकलेल्या अवस्थेत वाहन चालविले तर डुलकी लागण्याची भीती वाढते.
सुचविलेले अन्य उपाय- ट्रक चालक लेन सोडून रस्त्याच्या मधोमध वाहन चालवितात. त्यांनी लेनमधूनच गेले पाहिजे.- पुलावर ट्रक मधोमध असेल तर ओव्हरटेक करता कामा नये.- छोट्या चारचाकींनी अतिवेगात जाण्याचा प्रयत्न करू नये.- चालकांना दोन ठिकाणी १५ मिनिटांची विश्रांती बंधनकारक करावी. इतर वेळी गरजेप्रमाणेही थांबण्यासाठी सुविधा करावी.