औरंगाबाद : धावत्या रिक्षामध्ये मुलीची छेड काढणाऱ्या दारुड्या रिक्षाचालकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आनंद अंबादास पहुलकर ( ५०, रा. इंदिरानगर, बाजीपुरा ) असे आरोपीचे नाव आहे.
रिक्षाचालक छेडछाड करत असल्यानं तरुणीनं धावत्या रिक्षातून उडी मारल्याची घटना आज सकाळी मोंढा नाका येथे घडली होती.तरुणीच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्या चेहऱ्यावरही जखमा झाल्या आहेत. तरुणी ट्युशनला जात असताना हा प्रकार घडला. सकाळी ९ ते ९.३० च्या दरम्यान वर्दळीच्या जालना रोडवर ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी तपास सुरु केला. सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले.
काय आहे प्रकरण :
आरोपी आनंद अंबादास पहुलकर हा दारूच्या नशेत रिक्षा चालवत होता. त्याने तरुणीने सांगितलेल्या ठिकाणी न सोडता दुसऱ्याच ठिकाणी घेऊन जाणार असे सांगितले. तसेच मागे वळून तरुणीच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षामधून मोंढा नाक्याजवळ उडी घेतली. यात तरुणी गंभीर जखमी झाली. रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेली असताना अँब्युलन्स हेल्प रायडर्स ग्रुपचे निलेश सेवेकर यांनी तिला पाहिलं. त्यांनी तातडीनं मुलीला रस्त्याच्या कडेला घेऊन जात धीर दिला. तिची विचारपूस करत तिच्या घरच्यांशी संपर्क साधला. मुलीच्या पालकांना तातडीने तिथे बोलावून घेतले. रिक्षाचालकाला तिथे जमा झालेली गर्दी दिसली. नागरिकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना रिक्षाचालक लगेचच तिथून पळून गेला.