पुरामुळे गोदा काठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 03:59 PM2019-08-05T15:59:27+5:302019-08-05T16:05:43+5:30
वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8 विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद
औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. पूरपरिस्थितीमुळे गोदावरी नदीकाठच्या 52 गावांचा विद्युतपुरवठा रविवारी रात्रीपासून सुरक्षेसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामध्ये घरगुती आणि कृषिपंपाचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. आपात्कालिन परिस्थितीत संयम ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.
पूरस्थितीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून वैजापूर व गंगापूर तालुक्यातील 8 विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या 22 उच्चदाब वाहिन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 658 रोहित्रांवरील 5 हजार 56 ग्राहकांचा विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. बंद ठेवलेले रोहित्र हे प्रामुख्याने नदीकाठी असलेल्या कृषिपंपांचे आहेत. महावितरणच्या औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन अभियंते व कर्मचाऱ्यांना आपात्कालिन परिस्थितीत सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
पूर व पावसामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी गोदावरी नदीकाठावरील वीज संच, रोहित्र, विद्युत वाहिनी अनधिकृतपणे हाताळू नये. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. नागरिकांनी अशा स्थितीत संयम ठेवावा व महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.