वाळूज महानगर : सोलापूर-धुळे या महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे सिडकोचे जलवाहिनी टाकण्याचे काम दोन वर्षांपासून रखडले आहे. परिणामी राजस्वप्नपूर्ती सोसायटीतील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सिडको प्रशासन, नागरिक व राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक यांची शुक्रवारी संयुक्त बैठक झाली. यात सिडकोने पोलीस परवानगी घेऊन जलवाहिनी जोडणी करावी, असा निर्णय घेण्यात आला.
सिडको वाळूज महानगरातील गटनंबर ९४ मध्ये असलेल्या राजस्वप्नपूर्ती सोसायटीत सुमारे १०० कामगार कुटुंब राहतात. या सोसायटीत पाणी पुरवठा करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी सिडकोकडे २ लाख ७० हजार रुपयांची अनामत रक्कम भरण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या सोसायटीत पाणी पुरवठा सुरु झालेला नाही.
दरम्यान, सिडकोने या सोसायटीत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, सोलापूर-धुळे या राष्टÑीय महामार्गाचे काम सुरु असल्यामुळे रस्त्याच्या पलीकडे जलवाहिनी टाकण्याचे काम रखडले आहे. यामुळे या सोसायटीतील रहिवाशांना दोन वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
उन्हाळ्यात याची तीव्रता अधिक जाणवते. रहिवाशांनी सिडकोकडे तक्रारी केल्यानंतर टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. तीन ते चार दिवसांआड टँकरने पाणी पुरवठा होत आहे. जलवाहिनी जोडणी तात्काळ करावी, अशी मागणी अनिल माळवदे, सुशांत चौधरी, प्रेम जाधव, अशोक जोशी, पोपट गायकवाड, राहुल आढाव, गोपाल अग्रवाल, संदीप म्हस्के यांच्यासह रहिवाशांनी केली आहे.
सिडकोचे अधीक्षक अभियंता सुधाकर विसाळे, उपकार्यकारी अभियंता दीपक हिवाळे, राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर, सेनेचे विभाग प्रमुख नागेश कुठारे आदींची संयुक्त बैठक घेण्यात आली.
बैठकीत गाडेकर म्हणाले की, मुंबई-नागपूर महामार्ग या परिसरातून जात असल्याने वाहनांची वर्दळ असते. सोलापूर-धुळे महामार्गाचे कामही सुरु असल्यामुळे वाहतूक थांबवून जलवाहिनी टाकावी लागणार आहे.
या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगीची आवश्यकता भासणार असून, सिडकोने पोलिसांची परवानगी मिळविल्यास जलवाहिनी जोडणीचे काम करावे, असे बैठकीत सांगितले. या बैठकीत सिडकोचे उप अभियंता हिवाळे यांनी पोलिस प्रशासनाची परवानगी मिळविण्यासाठी पाठपुरावा करुन हा प्रश्न लवकरच निकाली काढणार असल्याचे सांगितले.