औरंगाबाद : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गैरकारभाराचा फटका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला बसला आहे. या प्रवेश प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने २० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी मुदत दिली होती. मात्र, मंडळातर्फे विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या दहावीच्या गुणपत्रिका २२ जून रोजी मिळणार असल्यामुळे आयटीआयचे नियोजित वेळापत्रक कोलमडले आहे. संचालनालयाला सुधारित वेळापत्रक जाहीर करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर केला. निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका देण्याची तारीख, वेळ जाहीर करण्याची परंपरा असते. मात्र ही परंपरा दहावीच्या निकालाच्या वेळी यावर्षी खंडित झाली. निकाल जाहीर होऊन सहा दिवस झाल्यानंतर राज्य मंडळाने २२ जून रोजी गुणपत्रिका संबंधित शाळांना देण्यात येणार असल्याची माहिती कळवली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने राज्यभरातील आयटीआय संस्थेतील प्रवेशासाठी १ जूनपासून नोंदणीला सुरुवात केली. ही नोंदणी २० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. तर २१ जून रोजी प्रवेशनिश्चिती होणार होती. यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता यादी, त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्याचे नियोजन होते. मात्र दहावीच्या गुणपत्रिकाच २२ जूनपर्यंत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यामुळे आयटीआयचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. दहावीच्या गुणपत्रिका वाटपाच्या आधारे नवीन वेळापत्रक बनविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आयटीआयच्या बहुतांश विषयांना (ट्रेड) प्रवेश हा दहावीच्या विविध विषयांना मिळालेल्या गुणांवरून दिला जातो.सर्व विषयांचे एकत्रित गुण हे मूळ गुणपत्रिकांवरच असतात. यामुळे प्रवेशनिश्चिती गुणपत्रिकाशिवाय शक्य नसल्याची माहिती औरंगाबादच्या शासकीय आयटीआयचे प्राचार्य मिलिंद बनसोडे यांनी दिली.
नोंदणीला थंड प्रतिसादआयटीआयच्या प्रवेशासाठी प्रत्येक वर्षी प्रचंड गर्दी होत असते. गुणवत्ता यादीही ९० टक्क्यांच्या वर जाते. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आयटीआयच्या नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. १ जूनपासून नोंदणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत केवळ १३८ जणांनी आॅनलाईन नोंदणी केली.
औरंगाबाद शासकीय ‘आयटीआय’ची आकडेवारी९८६ - उपलब्ध जागा२७ - विषय (ट्रेड)१३८- आॅनलाईल नोंदणी