सारा वृंदावन सोसायटीत भिषण पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:50 PM2019-04-15T23:50:37+5:302019-04-15T23:50:49+5:30
सिडको वाळूजमहानगरातील सारा वृंदावन सोसायटीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगरातील सारा वृंदावन सोसायटीत पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडले असून, रहिवाशांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागात आठवड्यातून एकदाच कमी दाबाने व अत्यल्प पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सिडको प्रशासनाकडून या सोसायटीत पाच ते सहा दिवसांआड कमी दाबाने व अत्यल्प पाणी पुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्याचे कुठलेही वेळापत्रक नाही. दरमहा नियमित पाणीपट्टी भरुनही सिडकोकडून सुरळीत पाणी पुरवठा केला जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात केवळ २० मिनिटे पाणी पुरवठा केला जात असल्याचा आरोप संतप्त महिलांनी केला आहे.पूर्वी या सोसायटीत आठवड्यातून दोनदा पाणी पुरवठा करण्यात येत होता.
मात्र एमआयडीसीकडून पुरेसे पाणी मिळत नसल्याचे कारण दाखवत सिडकोकडून आता आठवड्यातून फक्त एकदाच पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. सिडको प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप रहिवाशांतून होत आहे.
या सोसायटीत पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करुन मुबलक पाणी पुरवठा करावा, अन्यथा सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा सुनिता अहिरे, लता जाधव, इंदु तरटे, चित्रा धनायत, मनिषा पाटील, साधना शेळके, पुष्पा मंदाडे, लक्ष्मी स्वामी, सुमन राठोड, प्रतिभा भास्कर, स्वाती जाधव, छाया मुळे, विद्या खरात, सुवर्णा पाटील, संध्या सोनवणे, सविता पानकर, उषा केदार, सविता हिरे, सुनंदा कवाडे, वर्षा पाटील आदींनी दिला आहे.