...यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांना लागली जपानी भाषेची गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 07:51 PM2018-07-05T19:51:51+5:302018-07-05T19:59:06+5:30
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत १७० कामगारांनी जपानी भाषेचे धडे गिरवले आहेत.
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : ‘डीएमआयसी’अंतर्गत शेंद्रा येथे औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (आॅरिक) उभी राहते आहे. या सिटीकडे जपानी उद्योग आकर्षित होत आहेत. जगप्रसिद्ध पर्यटनस्थळांमुळे औरंगाबादेत येणाऱ्या जपानी पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सध्या जपानी भाषेचा चांगलाच बोलबाला असून, जिल्ह्यातील कामगारांनाही जपानी भाषेची गोडी लागली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांत १७० कामगारांनी जपानी भाषेचे धडे गिरवले आहेत.
गेल्या काही वर्षांत जपान आणि भारतादरम्यान दिवसेंदिवस चांगले संबंध प्रस्थापित होत आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळ लेणी आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळांमुळे जिल्ह्यात परदेशी पर्यटकांची कायम वर्दळ असते. दुसरीकडे भारतीय कंपन्यांबरोबर परदेशी कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आॅरिक सिटी महत्त्वपूर्ण ठरत आहे. यामध्ये काही महिन्यांपूर्वीच आॅरिक सिटी प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपान आणि कोरियन कंपनीच्या शिष्टमंडळाने पाहणी केली होती. २० जून रोजी दिल्लीमध्येही ‘आॅरिक ’विषयी जपानी कंपन्यांना सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे जपानी भाषेबद्दल जागरूकता वाढत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कामगारांना उद्योग क्षेत्रात अधिक संधी मिळाव्यात, यासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने चार वर्षांपूर्वी विदेशी भाषेच्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून पाऊल टाकले होते.
यामध्ये कामगार आणि त्यांच्या पाल्यांसाठी जपानी भाषेचे वर्ग घेण्यात येतात. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी आहे. सुरुवातीला प्रतिसाद किती मिळेल, याविषयी शंका होती; परंतु आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. बजाजनगर, सिडको, शिवाजीनगर येथे कामगार प्रशिक्षण वर्गात ही भाषा शिकवली जाते. गेल्या चार वर्षांत ६५० जणांनी या जपानी भाषेचे शिक्षण घेतले. यामध्ये १७० कामगार, तर ४८० कामगार पाल्यांच्या समावेश होता, अशी माहिती प्रशिक्षक आनंद गवई यांनी दिली. जपानी भाषा आत्मसात केल्यानंतर दुभाषक, गाईडसह उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध होतात. कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी नाममात्र फी आकारून हे वर्ग घेतले जात आहेत.
औद्योगिक क्षेत्रात वाढ
औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्रात डीएमआयसी, आॅरिक सिटीच्या माध्यमातून झपाट्याने वाढ होत आहे. कामगार आणि कामगार पाल्य जपानी भाषा शिकण्यास प्राधान्य देत आहेत. प्रशिक्षण वर्गास चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात ३२ कामगारांनी प्रशिक्षण घेतले.
- भालचंद्र जगदाळे, सहायक कल्याण आयुक्त, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
यशस्वी वाटचाल
जपानी भाषा शिकण्याकडे कल वाढत आहे. कामगार कल्याण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या वर्गात जपानी भाषा शिकून अनेकांनी विविध क्षेत्रांत यशस्वी वाटचाल केली आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर स्वत:च्या पातळीवर चांगला अभ्यास करून या भाषेत अधिक निपुणता मिळविता येते.
- आनंद गवई, जपानी भाषा प्रशिक्षक