ई-मोबिलिटी तंत्रज्ञान अवजड वाहनात लवकरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 06:35 PM2018-03-22T18:35:03+5:302018-03-22T18:39:14+5:30
अवजड वाहने जसे की, कंटेनर, हायवा ट्रक्स, प्रवासी वाहतूक करणार्या बसेसमध्ये ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान भविष्यात वापरणे शक्य होणार आहे.
औरंगाबाद : अवजड वाहने जसे की, कंटेनर, हायवा ट्रक्स, प्रवासी वाहतूक करणार्या बसेसमध्ये ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान भविष्यात वापरणे शक्य होणार आहे. यासाठी भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांकडे प्रस्ताव देण्यात येत आहेत, लवकरच जर्मन टेक्नॉलॉजी अवजड वाहनात वापरून भयावह अपघात रोखणे शक्य होईल, असा दावा सी-मोर आटोमोटिव्हचे बिझनेस हेड डॉ. माथियाज् झोबेल यांनी बुधवारी केला. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ग्रेगर माटेनर, जॉइंट व्हेंचर एक्सपर्ट ग्लोबचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत देशपांडे यांची उपस्थिती होती.
दोन दिवसांपूर्वी करमाड येथे कंटेनरचे टायर फु टून भयावह अपघात झाला. असे अपघात होऊ नयेत, यासाठी ई-मोबिलिटीचा अवजड वाहन उत्पादक कंपन्या वापर करून शकतील काय, यावर देशपांडे म्हणाले, भारतीय अवजड वाहन उत्पादक कंपन्यांशी याबाबत बोलणे सुरू आहे. हे तंत्रज्ञान अवजड वाहनात वापरल्यास टायरमधील हवेचा दाब, इंजिनमधील बिघाड, रस्त्यांवरील खड्डे, समोरून व मागून येणार्या वाहनांशी संभाव्य धडक होण्याचे संकेत या तंत्रज्ञानातून चालकाला मिळू शकतील. त्या अलर्टकडे जरी चालकाचे दुर्लक्ष झाले तरी अचानक ब्रेक लागून अपघात टाळणे शक्य होईल.
बुधवारी वॉशिंग्टनमध्ये ड्रायव्हरलेस कारचा अपघात होऊन एक महिला दगावली. यावर डॉ. झोबेल म्हणाले, ती घटना दुर्दैवी आहे; परंतु तेथील परिस्थितीवरून त्या अपघाताचे विश्लेषण करणे शक्य होईल. दरम्यान, जर्मन कौन्सिलिटचे राजदूत डॉ. उर्गेन मोरहार्ड यांच्या हस्ते ईसी-मोबिलिटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मुकुंद भोगले, डॉ.कवडे, संजीव तांबोळकर, हर्ष जाजू, उमेश दाशरथी, मोहिनी केळकर, प्रा.मुनीष शर्मा आदींची उपस्थिती होती.
भारतात ड्रायव्हरलेस कारला उशीर
भारतीय रस्त्यांवर ड्रायव्हरलेस कार धावण्यास मोठा उशीर आहे. ई-मोबिलिटीचे तंत्रज्ञान सध्या आशिया, युरोप, अमेरिकेत वापरले जात आहे. भारतामध्ये ते तंत्रज्ञान वापरण्यासाठी स्थानिक कार उत्पादक कंपन्यांशी बोलणे सुरू आहे; मात्र अद्याप कुणी पुढे आलेले नाही. सध्या फ्रंट अॅण्ड बॅक पार्किंग कॅमेर्याची सुविधा येथील कार उत्पादक देत आहेत. गुगल नेव्हिगेशन अलीकडच्या काही उत्पादनांमध्ये मिळते आहे. औरंगाबाद ते पुणे मार्गे बंगळुरूपर्यंत रोडचे रायडर मॅपिंग तयार करण्यात आले आहे. त्या रोडवर जे बदल होतील, ते सॉफ्टवेअरमार्फत अपडेट होतील, असे यावेळी सांगण्यात आले.