१) वाहतूक व्यवस्था ठप्प
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागले आणि एसटी, खाजगी बस, रेल्वे, विमानसेवा ठप्प झाली. परिणामी, विमानतळ, रेल्वेस्टेशन आणि बसस्थानकांत ‘भुतो न भविष्यती ’ असा शुकशुकाट अनेक दिवस पहायला मिळाला. वाहतुक सुविधेअभावी प्रत्येक व्यक्ती जेथे होता, तेथेच अडकला.
२)रुळांवर मृत्यूचे तांडव, १६ मजुरांना रेल्वेने चिरडले
-मृत्यूचे तांडव काय असते हे ८ मे रोजी पहाटे जिल्ह्याने अनुभवले. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले २० कामगार घराच्या ओढीने रेल्वे रुळावरून पायीच मध्य प्रदेशकडे निघाले होते. रात्रभर पायी चालून थकलेले जीव पहाटे काही क्षण रेल्वे रुळावर विसावले अन् धडाडत आलेल्या रेल्वे मालगाडीने अक्षरशा: त्यांच्या खांडोळ्या केल्या. यात दुर्देवाने १६ मजुरांचा मृत्यू झाला. जीवंतपणी त्यांना पायपीट घडली. पण मृत्यूनंतर मृतदेह घरी नेताना त्यांच्या नशीबी रेल्वे आली. या घटनेने देशभरात हळहळ आणि एकच संताप व्यक्त झाला.
३)श्रमीक रेल्वेने कामगारांची घरवापसी.
-लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड आदी राज्यांतील हजारो कामगार मराठवाड्यात अडकले होते. दक्षिण मध्य रेल्वेकडून औरंगाबादहून मे महिन्यांत १२ श्रमीक रेल्वे सोडण्यात आल्या. त्यातून १५ हजारांवर कामगारांनी घरवापसी केली. रोजीरोटी देणार्या शहरातून जड अंतकरणाने या मंजुरांनी निरोप घेतला.
४)रेल्वे २ महिन्यांनंतर ‘ट्रॅक’वर
- लॉकडाऊनच्या तब्बल २ महिन्यांनंतर १ जूनपासून नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस पुन्हा धावण्यास सुरुवात झाली. या रेल्वेमुळे मराठवाड्यात अडकलेल्या लोकांना गावी परतता आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अन्य ७ विशेष रेल्वेही सुरु करण्यात आल्या. मात्र, अद्याप एकही पॅसेंजर रेल्वे सुरु नसल्याने सर्वसामान्यांची गैरसोय सुरूच आहे.
५) विमानसेवेचे पुन्हा ‘टेकऑफ’
-तब्बल ३ महिन्यानंतर १९ जूनपासून इंडिगोची दिल्ली - औरंगाबाद विमानासेवा सुरु झाली. त्यांनंतर एअर इंडियाचीही सेवा सुरु झाली. टप्प्याने दिल्लीसह हैदराबाद, मुंबई आणि बंगळुरूसाठी पुन्हा एका विमानांचे ‘टेकऑफ’ सुरु झाले.
६)१५१ दिवसांनी ‘एसटी’ची चाके गतीमान
- काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १५१ दिवस म्हणजे तब्बल ५ महिने ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्टपासून सुरु झाली. परिणामी, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अर्थव्यवस्थेचे चाकही गतिमान होण्यास मदत झाली.
७)‘एसटी’त पीएफ घोटाळा, निवृत्त चालकाचा खून
-एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकाची खोटी स्वाक्षरी करून त्यांच्या भविष्य निर्वाह निधीची ८ लाखांची रक्कम काढून घेण्यात आली. हा प्रकार उघड होताच एसटीतील लिपिकानेच साथीदाराच्या मदतीने निवृत्त चालकाचा निर्घृण केल्याची धक्कादायक घटना १३ जुलै रोजी उघड झाली. यामुळे एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली. यानंतर अन्य निवृत्त कर्मचार्यांचीही ‘पीएफ’ची रक्कम हडपल्याचे समोर आले.
८)बसपोर्ट, नव्या बसस्थानकाची प्रतीक्षाच
- भूमिपूजन होऊनही सरत्या वर्षात सिडको बसस्थानकाच्या जागी बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागी नव्या बसस्थानकाचे काम सुरु होण्याची प्रतीक्षाच करावी लागली. निधीअभावी करोडीत आरटीओ कार्यालयाच्या इमारतीचेही काम रेंगाळले आहे.
९)४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ''''''''मीटर डाऊन'''''''' .
- कोरोनामुळे एसटी बस, रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शाळाही बंद आहे. परिणामी, प्रवासी, विद्यार्थी वाहतूक करून उदरनिर्वाह करणाऱ्या जिल्ह्यातील ४५ हजार रिक्षाचालकांचे आर्थिक ''''''''मीटर डाऊन'''''''' झाले. लॉकडाऊनच्या काळात किमान ८० कोटींचे उत्पन्न बुडाले. शिवाय वाहतूक सुरु झाल्यानंतर रोज १०० ते २०० रुपयेही मिळेना झाले. गेल्या काही दिवसांत मात्र, रिक्षांची वाहतूक सुरळीत होताना दिसतेय.