लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: येथील देगलूर नाका भागातील ईदगाह मैदानावर शनिवारी सकाळी ९ वाजता मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून ईद - उल - अजहा (बकरी ईद) उत्साहात साजरी केली़ यावेळी मौलाना मोईन खासमी यांनी विश्वशांतीसाठी प्रार्थना केली़त्याग आणि बलिदानाचे प्रतीक असलेली ही ईद मुस्लिम बांधवांनी उत्साहात साजरी केली़ शिवाजीनगर येथील मशीद आबेदीन, खडकपुरा येथील मशीद बाराइमाम तसेच पीरबुºहाणनगर, श्रीनगर, देगलूरनाका, जुनागंज येथील मशिदीत सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान ईद - उल - अजहा ची नमाज अदा करण्यात आली़ त्यानंतर देगलूरनाका येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली़ मौलाना साद अब्दुला यांनी नमाज अदा करून खुदबा दिला़ त्यानंतर मौलाना मोईन खासमी यांचे प्रवचन पार पडले़ त्यांनी आपल्या प्रवचनात मानवाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली़ मौलाना मोईन खासमी यांनी संपूर्ण विश्वाच्या शांततेसाठी, बिहार, म्यानमार येथील पूरग्रस्तांच्या रक्षणासाठी व देशात एकात्मता, बंधुभाव नांदावा यासाठी प्रार्थना केली़या ठिकाणी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या़ त्यानंतर ठिकठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत जाऊन आपल्या पूर्वजांच्या समाधीवर पुष्प अर्पण केले़ ईद - उल - अजहा निमित्त कुर्बानीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात नऊ स्थळ निश्चित करण्यात आले होते़ त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी सकाळपासून मनपाने स्वच्छता कर्मचाºयांची नियुक्ती केली होती़
ईद-उल-अजहा उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:33 AM