मराठवाड्यात वीज पडून आठ ठार, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:48 PM2018-06-21T23:48:44+5:302018-06-22T06:00:00+5:30
आठवडाभराच्या ब्रेकनंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी गुरुवारी जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद : आठवडाभराच्या ब्रेकनंतर मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांत काही ठिकाणी गुरुवारी जोरदार पाऊस झाला. वेगवेगळ्या पाच घटनांत वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला. उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे शेतीत काम करीत असताना गुरुवारी दुपारी वीज कोसळून दोन शेतमजूर महिला ठार झाल्या. तर सोबतच्या अन्य तीन महिला जखमी झाल्या आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातील वाणेवाडी येथे शेतात शालुबाई चंद्रकांत उर्फ बबन पवार (५०), शीतल तुळशीराम घुटुकडे (३२) यांच्यासह श्यामल लहु सरवदे (४०), कौशल्या शेषेराव सरवदे (४५) व छाया भास्कर सरवदे (५०) या महिला मशागतीचे काम करीत होत्या़ दुपारी वाऱ्यासह आभाळ भरून आले. दीडच्या सुमारास अचानक वीज कोसळली. या घटनेत शालुबाई पवार व शीतल घुटुकडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघी जखमी झाल्या आहेत़ त्यांना तेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शालुबाई यांच्या पश्चात एक मुलगा व दोन विवाहित मुली आहेत, तर शीतल घुटुकडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
नांदेड जिल्ह्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. केदारगुंठा (ता. देगलूर) येथील मारोती केशवराव बाराळे (५०) यांचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ४.२० च्या सुमारास पाऊस पडत असल्याने एका झाडाखाली ते थांबले होते. नेमक्या त्याच झाडावर वीज पडली, अशी माहिती तहसीलदार वसंत नरवाडे यांनी दिली. कंधार तालुक्यातील चुड्याचीवाडी येथे वीज पडून उत्तम विक्रम मुंडकर (५५) यांचा मृत्यू झाला तर इंदराबाई गोंविद मुंडकर या जखमी झाल्या. त्यांना मुखेड येथील ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मंडळ अधिकारी धोंडगे यांनी दिली. तिस-या घटनेत मलकापूर (खेरडा) ता. किनवट येथे गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या दरम्यान वीज पडून बहीण- भावाचा मृत्यू झाला. शालिनी लवसिंग जाधव (८), हेमंत लवसिंग जाधव (१०) अशी या दोघांची नावे आहेत. गुरुवारी आईवडील व आजीसोबत गावानजीकच्या शेतात दोघेही गेले होते. शालिनी तिसºया वर्गात तर हेमंत पाचवीत शिकत होता. वीज पडून शालिनी व हेमंत यांचा जागीच मृत्यू झाला, तर आई व आजी यांना वीजेच्या झळा बसल्या. आजीने दोन तर आईने पलटी खाल्या. दोन लेकरं जगात नाहीत, हे कळल्यावर वडिलांनाही जबर मानसीक धक्का बसला. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतांच्या वारसांना लवकरच नैसर्गिक आपत्ती सानुग्रह अनुदानाची मदत केली जाईल, असे प्रभारी उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. जळकोट तालुक्यातील मरसांगवी शिवारात वसीम हसन भांडे (१५) हा शेतात गेला असताना त्याच्या अंगावर वीज कोसळली़ यात तो गंभीर जखमी झाला़ त्याला ग्रामस्थांनी तात्काळ जळकोटच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले़ डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़ शाळकरी मुलाच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे़ औसा तालुक्यात कन्हेरी येथील येथील सुभाष लिंबाजी चव्हाण (६०) शेतात काम करीत असताना वीज पडल्याने जागीच ठार झाले.
नांदेड जिल्ह्यात ८९.४९ मि.मी. पाऊस
नांदेड : गुरुवारी दुपारी नांदेड जिल्ह्यातील मुखेड, कौठा, बारुळ, बाºहाळी आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८९.४९ मि.मी. पावसाची नोंद झाली. यामध्ये भोकर तालुक्यात ८.७५ मि.मी. पावसाची नोंद झाली. कंधार तालुक्यात ७.८३, लोहा - ९.६७, किनवट तालुक्यात ४.०० , माहूर- २.२५, हदगाव तालुक्यात ७.१४, देगलूर - ८.५०, धर्माबाद- १०.००, बिलोली - १६.८०, नायगाव - १२.४०, तर मुदखेड तालुक्यात २.१४ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात १५ मि.मी.पाऊस
परभणी : जिल्ह्यात सरासरी १५.०८ मि.मी. पाऊस झाला. सर्वदूर पाऊस झाल्याने शेतक-यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. २० जून रोजी सायंकाळच्या सुमारास परभणी, गंगाखेड, पूर्णा तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यानंतर रात्रीतून सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक ३६.८० मि.मी. पाऊस झाला आहे. जिंतूर तालुक्यात ३२.१७, मानवत २३.३३, पालम १२, परभणी ६.५०, पूर्णा ७.८०, पाथरी ८.३३, गंगाखेड ५.७५ आणि सोनपेठ तालुक्यात ३ मि.मी. असा जिल्हाभरात सरासरी १५.०८ मि.मी. पाऊस झाला आहे. जून महिन्यात आतापर्यंत १३०.१८ मि.मी. पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत या पावसाची टक्केवारी १६.८१ एवढी आहे.
दीर्घ विश्रांतीनंतर हिंगोलीत पाऊस
हिंगोली : जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर बुधवारपासून पावसाचे आगमन झाले आहे. बुधवारी विदर्भ सीमेलगतच्या गावांतच पावसाने हजेरी लावली. गुरुवारी हिंगोली शहर व परिसरातही पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ७ च्या सुमारास हिंगोली शहर व परिसरातील बासंबा, बळसोंंड, कारवाडी आदी गावांत वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. हिंगोली तालुक्यातील माळहिवरा ७ मी. मी. सिरसम बु. ३, कळमनुरी २, नांदापूर २१, आ. बाळापूर २६, डोंगरकडा १, सेनगाव ९ , गोरेगाव ५८ , आजेगाव २५, साखरा १७, पानकनेरगाव २२, हट्टा ३० मी. मी आणि कुरुंदा ९ मी. मी. पाऊस झाला.
जळकोट, औसा, चाकूर तालुक्यात जोरदार पाऊस
लातूर : जिल्ह्यात दुपारनंतर कोसळलेल्या पावसाने हाहाकार माजवला. जळकोट, औसा, चाकूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. लातूर शहरातही दुपारी चारपासून रिमझीम पाऊस बरसत होता. औसा तालुक्यात गुरुवारी दुपारी १.३५ पासून तब्बल एक तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अंदोरा येथील शेतकरी गुलाब जानिमिया अत्तार यांची म्हैस, बोरफळचे सोपान राजाराम यादव यांची गाय तर फत्तेपूर येथील विनायक धानुरे यांची शेतात बांधलेली म्हैस वीज पडून दगावली. वादळी वा-याने विजेच्या खांबासह तारा तुटल्याने अर्धा तालुका चार तास अंधारात होता. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. तहसील कार्यालयाजवळील नीलगिरीचे झाड उखडून जलकुंभावर पडल्याने जुनाट जीर्ण जलकुंभाला भेगा गेल्या आहेत. चाकूर शहरात विजेच्या कडकडात पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास येथील विजेच्या १३२ उपकेंद्रावर वीज पडली. त्यामुळे उपकेंद्रातील अनेक पार्ट जळाले. परिणामी शहरासह तालुक्यातील अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.