औषधोपचारांसह वृद्धांना हवी मायेची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 09:57 PM2019-04-04T21:57:53+5:302019-04-04T21:58:43+5:30
आजारांवर औषधोपचारांसह ज्येष्ठांना कुटुंबियांनी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब दिली पाहिजे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
औरंगाबाद : वाढत्या वयोमानानुसार शरीरातील विविध अवयवांत बदल होत जातो. त्यामुळे वार्धक्याबरोबर स्मृतिभ्रंश, नेत्रविकार, बहिरेपणा अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागते. अशा वेळी आजारांवर औषधोपचारांसह ज्येष्ठांना कुटुंबियांनी पुरेसा वेळ दिला पाहिजे. त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधून मायेची ऊब दिली पाहिजे, असा सूर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून निघाला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) वार्धक्यशास्त्र विभाग आणि मेडिकल रिसर्च सोसायटी यांच्या वतीने गुरुवारी (दि.४) ‘वार्धक्यशास्त्र व त्याची गरज’ या विषयावर एकदिवसीय कंटिन्युर्इंग मेडिकल एज्युकेशन (सीएमई) घेण्यात आले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या हस्ते ‘सीएमई’चे उद्घाटन झाले. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. राजन बिंदू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, वार्धक्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर, नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. वर्षा नांदेडकर, डॉ. वर्षा रोटे, डॉ. शैलजा राव, डॉ. लईक मोहंमद, डॉ. वसंत पवार, डॉ. अंजली शेटे, डॉ. स्मिता अंदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मंगला बोरकर म्हणाल्या, डॉक्टरांपासून नातेवाईकांकडून वयोवृद्ध लोकांची शुश्रुषा केली जाते. अनेक जण शुश्रुषा करण्यासाठी नर्सचीही नेमणूक करतात. परंतु शुश्रुषा करताना अनेकदा वृद्धांचा अनादर केला जातो. परंतु त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांच्याशी सौजन्याने वागले पाहिजे. वेळेवर आवश्यक ती औषधी दिली पाहिजे. अनेक घरांमध्ये वृद्धांची शुश्रुषा करण्याची जबाबदारी ही फक्त महिलेवर टाकली जाते. परंतु घरातील प्रत्येक सदस्याने त्यासाठी मदत केली पाहिजे.
डॉ. शैलजा राव यांनी वार्धक्यशास्त्र नेमके काय आहे, यावर प्रकाश टाकला. ६० वर्षांवरील व्यक्तींची औषधोपचारांसह विविध काळजी कशी घ्यावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. लईक यांनी वयोमानानुसार शरीररचनेत होणाऱ्या बदलाविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी डॉ. महेश पाटील, डॉ.आशिष राजन, डॉ. झेबा फिरदोस, डॉ. सुमित चव्हाण, डॉ. प्रदीप राऊत, डॉ. कुणाल शिसोदिया, डॉ. प्रतिमा कुलकर्णी, डॉ. आनंद वाकोरे, सुभीही निसार, पूजा जगताप, नागेश सुरडकर, किशोरी पात्रे, राजेश घोडके, अभिराज पाटील, मनबीर कौर, महेबूब बेग आदींनी प्रयत्न केले.
मधुमेह, हायपर टेन्शनने बहिरेपणा
डॉ. वसंत पवार म्हणाले, वार्धक्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी समोरची व्यक्ती अधिक मोठ्याने बोलते. परंतु त्याचा ज्येष्ठांना अधिकच त्रास होतो. बहिरेपणा टाळण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार केला पाहिजे. मधुमेह, हायपर टेन्शन टाळावे अथवा नियंत्रणात ठेवले पाहिजे. अन्यथा त्यातूनही बहिरेपणा येऊ शकतो.