छत्रपती संभाजीनगर : मुंबईला जाणाऱ्या नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडीच्या इंजिनमध्ये विद्युत केबल अडकल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगर रेल्वेगेटदरम्यान घडली. यावेळी प्रसंगावधान राखून चालकाने रेल्वे थांबविल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर मध्यरात्रीपर्यंत रेल्वेगाडी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगर रेल्वेगेटदरम्यान अंधारात उभी होती.
या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की,मुंबईला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस रात्री साडेनऊ वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावर येत असते. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास ही गाडी मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन कडून मुख्य स्थानकाकडे जात असताना शिवाजीनगर येथे रेल्वेमध्ये विद्युत केबल अडकल्याचे चालकाच्या निदर्शनास आले.यानंतर चालकाने या गाडीला ब्रेक लावले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे प्रवाशांना घटनास्थळीच अंधारात रेल्वेगाडीत बसून राहावे लागले.
मुंबईला जाण्यासाठी नऊ वाजेपासून छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशन येथे येऊन बसलेल्या प्रवाशीही रेल्वेची प्रतिक्षा करीत ताटळकत बसलेले होते. या घटनेचा फटका अन्य रेल्वे गाड्यांनाही बसल्याचे सुत्रांनी सांगितले.एकेरी रूळ असल्याने सिकंदराबादकडे जाणारी अजिंठा एक्सप्रेस रेल्वे गाडी छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली. तर मुंबईला निघालेली देवगिरी एक्सप्रेस छत्रपती संभाजीनगरला पोहचण्यापूर्वीच रस्त्यात थांबविण्यात आल्याचे समोर आले.
केबल चोरीचा प्रकार?
घटना घडलेल्या रेल्वे मार्गावर शुक्रवारी विद्युतीकरणची ॲल्युमिनिअमची केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या केबलवर चोरट्यांचा डोळा असतो. यापूर्वी नगरसोल-तारुरदरम्यान विद्युतीकरणची केबल चोरट्यांनी लांबवली होती. तेव्हा खांबावर लटकलेली उर्वरित केबल देवगिरी एक्स्प्रेसमध्ये अडकल्याने थांबवावी लागली होती. मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन ते शिवाजीनगर रेल्वेगेटदरम्यान शुक्रवारी घडलेल्या घटनेमागेही केबल चोरीचा प्रकार असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.