५००० रुपयांच्यावर वीज बिल रोखीने भरता येणार नाही; आदेशाचा कर्मचाऱ्यांकडून विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 09:28 PM2023-08-25T21:28:10+5:302023-08-25T21:30:02+5:30

संघटना म्हणते : आदेश वास्तविक स्थिती व सर्वसाधारण वीजग्राहकांच्या हिताविरुद्ध

Electricity bill above Rs.5000 cannot be paid in cash; Opposition to the order by the employees | ५००० रुपयांच्यावर वीज बिल रोखीने भरता येणार नाही; आदेशाचा कर्मचाऱ्यांकडून विरोध

५००० रुपयांच्यावर वीज बिल रोखीने भरता येणार नाही; आदेशाचा कर्मचाऱ्यांकडून विरोध

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील वीज ग्राहकांना ५,००० रुपयांच्या वर वीज बिलाचा भरणा रोखीने करता येणार नाही. हा आदेश ग्राहकांच्या हिताविरुद्ध असल्याचे सांगून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने विरोध केला आहे.

वीज नियामक आयोगाच्या या आदेशानुरूप महावितरणने दि. २६ जुलैला अशा एल. टी. वीज ग्राहकांकडून ५००० रुपयांच्या वर रोख रक्कम स्वीकारू नये, असे आदेश काढले आहेत. महावितरण कंपनीने ऑनलाइन वीज भरणा सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ती अनेक ग्राहकांना जमत नाही. अनेक ग्राहक ग्रामीण भागात राहत असून, त्या ठिकाणी नेटवर्कच्या अडचणी येत असतात. अनेक ग्राहक हे बिल भरणा केंद्रावर जाऊन पैसे भरत असतात. स्वतःचे वीज बिल रोख भरावे, चेकने भरावे की ऑनलाइन भरावे, हा त्यांचा अधिकार आहे. वीजग्राहकांच्या अधिकारांवर ही गदा आहे.

ग्राहकांचा रोष पत्करावा लागणार
दरमहा होणाऱ्या महसुलावरसुद्धा याचा गंभीर परिणाम होऊन थकबाकी वाढण्याचा धोका आहे. महावितरणच्या बहुसंख्य कर्मचाऱ्यांना चालू वीज बिलाची वसुली, थकबाकीची वसुली करतानासुद्धा या निर्णयामुळे ग्राहकांचा रोष पत्करावा लागणार आहे. महाराष्ट्राच्या शहरासह ग्रामीण भागातील गाव-खेड्यांतील सर्व वीजग्राहक ऑनलाइन पेमेंट करण्यापर्यंत शिक्षित व समृद्ध झाले आहेत, हा वीज नियामक आयोगाचा समजच मुळात चुकीचा आहे.

सक्त विरोध ...
या निर्णयाला वर्कर्स फेडरेशनचा सक्त विरोध आहे. वीज बिलाच्या वसुली मोहिमेत सहभागी असलेल्या वीज कामगारांनी त्यांच्या क्षेत्रात वीजग्राहकांना या निर्णयाची माहिती द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. मोहन शर्मा व सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर यांनी केले आहे.

Web Title: Electricity bill above Rs.5000 cannot be paid in cash; Opposition to the order by the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.