- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : महापालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर राजरोसपणे अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ज्याला जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमण करून ठेवले आहे. अरुंद रस्त्यांवर वाहनांची बेकायदेशीरपणे पार्किंग करण्यात येते. फुटपाथवर पावलापावलांवर अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना मुख्य रस्त्यांवरून चालणेही जिकिरीचे ठरत आहे. या गंभीर प्रकाराकडे मनपा प्रशासन अजिबात गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. मागील चार दिवसांमध्ये मनपाने पोलिसांच्या मदतीने राबविलेली अतिक्रमण हटाव मोहीम निव्वळ पाट्या टाकणारी होती.
‘लोकमत’ने १६ नोव्हेंबरच्या अंकात शहरातील प्रमुख रस्त्यांची अतिक्रमणांमुळे कशी वाईट अवस्था झाली आहे, याचा सविस्तर वृत्तांत प्रकाशित केला होता. याची दखल पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी घेतली. त्यांनी त्वरित उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. दिनेशकुमार कोल्हे, पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे यांना महापालिकेत पाठविले. महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली वाहतूक सुरळीत राहावी, मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे असू नयेत यावर चर्चा झाली. मंगळवार, १९ नोव्हेंबरपासून कारवाईला सुरुवात करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले. यानंतर खंडपीठाने ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेऊन सुमोटो याचिका दाखल करून घेतली.
मुकुंदवाडीत झाला होता विरोधबुधवार, २० नोव्हेंबर रोजी महापालिकेने मुकुंदवाडी भाजीमंडई येथून करवाईला सुरुवात केली. रस्त्यावर भाजीपाला विकणाऱ्यांना मनपाच्या पथकाने हुसकावून लावले. याठिकाणी राजकीय, व्यापाऱ्यांकडून विरोध झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे मनपा अधिकाऱ्यांनी राजकीय मंडळींसमोर अक्षरश: माफी मागून कारवाई गुंडाळली. मुकुंदवाडी ते दीपाली हॉटेलपर्यंत फुटपाथवरील अतिक्रमणे सोडून देण्यात आली. जयभवानीनगर रोडवरील सर्व अतिक्रमणे जशास तशी होती. जयभवानीनगर चौकात फक्त एकमेव पानटपरी जप्त करण्याचा प्रयत्न केला. पानटपरीचालकाने डोळे वटारताच मनपाच्या पथकाने पानटपरीही सोडून दिली.
चंपाचौक ते आझाद चौकतिसऱ्या दिवशी मनपाच्या पथकाने चंपाचौक ते आझाद चौक या मुख्य रस्त्यावर कारवाईची औपचारिकता पूर्ण केली. या भागातील रस्त्याच्या मध्यभागी असलेली वाहने, हातगाड्या, व्यापाऱ्यांची मोठमोठी अतिक्रमणे याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या भागातून सायंकाळी दुचाकी वाहनही सुरळीत नेता येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, वाहनांची पार्किंग करण्यात येते. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून या भागातून ये-जा करावी लागते.
कारवाईपूर्वी हातगाड्यांना मनपाची सूचनाज्या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे, त्या रस्त्यावर हातगाडीचालक, अतिक्रमणधारकांना मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच पूर्वसूचना देण्यात येते. मनपाचे पथक दाखल होईपर्यंत हातगाडीचालक, अतिक्रमणधारक पसार होतात. मनपाचे पथक गेल्यावर परत त्याच जागेवर येऊन उभे राहतात.
सतत अतिक्रमणे झाल्यास गुन्हे दाखल कराशहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार अतिक्रमणे होत असतील तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा, अशी सूचनाही पोलिसांनी मनपाला १६ नोव्हेंबरच्या बैठकीत केली. दिल्लीगेट येथील फर्निचर व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करू असे मनपाने नमूद केले. आजपर्यंत कोणत्याही पोलीस ठाण्यात साधा तक्रार अर्जही दिला नाही.
धोकादायक चौक कोण दुरुस्त करणारलिंक रोड टी पॉइंट, रेल्वेस्टेशन चौक, जिल्हा न्यायालय चौक, क्रांतीचौक, अमरप्रीत चौक, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल चौक, जळगाव टी पॉइंट, मुकुंदवाडी, महानुभाव आश्रम चौक, महावीर चौक, मिल्ट्री हॉस्पिटल टी पॉइंट, छावणी गणपती विसर्जन टी पॉइंट, आयकर भवन टी पॉइंट, नगरनाका, हॉटेल शरद टी पॉइंट, आंबेडकरनगर चौक, हर्सूल टी पॉइंट, एमआयटी चौक, गोदावरी चौक, देवळाई चौक, केम्ब्रिज चौक.
कुंभारवाडा कॉर्नर... गुलमंडी चौकाजवळील कुंभारवाडा कॉर्नरवर अतिक्रमणांनी ७० टक्के रस्ता व्यापला आहे. या भागात महिला खरेदीसाठी मोठ्या संख्येने दररोज दाखल होतात. पादचारी महिलांना रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण असते. त्यातच दुचाकी, चारचाकी वाहनांची येथून सतत वर्दळ असते. जीव मुठीत धरून महिला सोमवारीही खरेदी करीत होत्या.
रंगारगल्ली... जुन्या शहरातील अत्यंत गजबजलेली बाजारपेठ म्हणजे रंगारगल्ली होय. अतिक्रमणांनी या गल्लीचा ‘रंग’च उडाला आहे. महापालिकेने चार दिवसांपूर्वी या भागात मोहीम राबविली असली तरी परिस्थिती जशास तशी आहे. अतिक्रमणे एक इंचही कमी झालेली नाहीत.
निराला बाजार... शहरातील अत्यंत हायफाय मार्केट म्हणजे निराला बाजार होय. या भागातील मोठ-मोठ्या नामांकित कंपन्यांच्या शोरूमसमोर फुटपाथच्या खाली चारचाकी वाहने अत्यंत शिस्तीत उभी असतात. वाहनांच्या या पार्किंगमुळे अर्ध्याहून अधिक रस्ता पार्किंगने व्यापला जातो. फुटपाथवर दुचाकी, रस्त्यावर चारचाकी, पादचाऱ्यांनी नेमके चालावे तरी कोठून याचे उत्तर महापालिका, वाहतूक पोलिसांनी द्यावे...?
पोलिसांनी कर्तव्य बजावले, पण...नियोजित कार्यक्रमानुसार पोलिसांनी मनपाला मोठा बंदोबस्त दिला. पहिल्या दिवशी पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात झाली. टिळकपथ येथील फक्त फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. रस्त्यांवर उभी राहणारी वाहने, व्यापाऱ्यांचे अतिक्रमण याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गुलमंडीवर मनपाच्या पथकाला पाहून सर्व फेरीवाले पसार झाले होते. औरंगपुरा, जि.प. कार्यालयापर्यंत मोहीम राबविण्यात आली. सायंकाळी ४ वाजता अत्यंत वर्दळीच्या शाहगंज चमन येथे कारवाई करण्यात आली. मोजक्याच दोन ते तीन हातगाड्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मनपाचे पथक रवाना होताच अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये परिस्थिती जशास तशी झाली.