वाळूज महानगर : एमआयडीसीकडून नियमित नालेसफाई केली जात नाही. तसेच काही उद्योजकांनी कपंनीसमोर भराव टाकल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बऱ्याच ठिकाणी बाधित झाला आहे. साचलेले सांडपाणी कंपनीत शिरत असल्याने व दुर्गंधी पसरत असल्याने वाळूज औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक त्रस्त झाले आहेत.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे सांडपाणी वाहून जाण्यासाठी एमआयडीसीने नालीची व्यवस्था केली आहे. परंतू एमआयडीसीकडून नालीची नियमित साफसफाई केली जात नाही. त्यामुळे अनेक सेक्टरमधील नाल्या तुंबल्या असून सांडपाणी रस्त्यालगत साचले आहे. शिवाय अनेक छोट-मोठ्या उद्योजकांनी सांडपाण्यापाचा त्रास होऊ नये म्हणून भराव टाकला आहे. मात्र, सांडपाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्याचा नैसर्गिक प्रवाह बऱ्याच ठिकाणी बाधित झाला आहे. परिणामी सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.
अनेकदा पाण्याचा प्रवाह वाढल्याने लगतच्या कंपनीत हे पाणी शिरत आहे. दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव झाल्याने कामगार व उद्योजकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील डब्ल्यु सेक्टरमधील प्लॉट नंबर ८० ते ८५ पर्यंतच्या भागात सारखे सांडपाणी तुंबत आहे. सांडपाण्याच्या उग्र वासामुळे मळमळ, उलटी, डोकेदुखी आदी आजाराचा त्रास कामगार व उद्योजकांना सहन करावा लागत असून कामगारांना कंपनीत काम करणे अवघड झाले आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, तो होऊ शकला नाही.