हंगामी वसतिगृहाच्या सर्वच प्रस्तावांत त्रुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:48 PM2017-11-25T23:48:34+5:302017-11-25T23:48:46+5:30
कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कामाच्या शोधात स्थलांतरित झालेल्या कुटुंबियातील पाल्याच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवता यावे यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपये खर्च करून हंगामी वसतिगृहांची दरवर्षी स्थापना केली जाते. यंदा मात्र वसतिगृहाचे नियोजन बारगळल्याने वसतिगृह अद्याप सुरू झाले नाहीत. शिवाय दाखल करण्यात आलेल्या ४० शाळांच्या प्रस्तावांतही त्रुटी आढळून आल्या आहेत, हे विशेष.
जिल्ह्यातून यंदा कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे यावर्षी स्थलांतरित कुटुंबातील मुलांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित. त्यामुळे ऊसतोड, वीटभट्टी व इतर कामगारांच्या पाल्यांचा शिक्षणाचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. दरवर्षी शिक्षण विभागाकडून कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मुलांसाठी अनेक ठिकाणी हंगामी वसतिगृह सुरू केली जातात. यावर्षी मात्र स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण अहवाल व वसतिगृहाचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब झाला. शिक्षण विभागातर्फे दरवर्षी पूर्वतयारी म्हणून संभाव्य स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाते. यावर्षीही मोहीम राबवून सर्वेक्षण करण्यात आले. परंतु सदर अहवाल सादर करताना दिरंगाई करण्यात आली. उशिराने का होईना वसतीगृह स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया गतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातून एकूण ४० प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्रुटींची पूर्तता झाल्यास प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. तसेच हंगामी वसतिगृह स्थापनेसंदर्भात आता लवकरच बैठक घेतली जाणार आहे.