ब्राह्मणांसाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 11:23 PM2018-12-08T23:23:06+5:302018-12-08T23:23:21+5:30
गुणवत्ता असली तरी आर्थिक बाजू कमजोर असल्याने समाजातील मुला-मुलींना व्यावसायिक शिक्षण घेण्यात अनंत अडचणी येतात. त्यामुळे ब्राह्मण समाजाला व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी अभ्यासगट स्थापन करून समाजाचा सर्व्हे करण्यात यावा. तत्पूर्वी, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समस्त ब्राह्मण संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.
औरंगाबाद : गुणवत्ता असली तरी आर्थिक बाजू कमजोर असल्याने समाजातील मुला-मुलींना व्यावसायिक शिक्षण घेण्यात अनंत अडचणी येतात. त्यामुळे ब्राह्मण समाजाला व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी अभ्यासगट स्थापन करून समाजाचा सर्व्हे करण्यात यावा. तत्पूर्वी, स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी समस्त ब्राह्मण संघटनांच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली.
या मागण्यांसाठी समन्वय समितीच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर २२ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पत्रपरिषदेत करण्यात आली. मराठवाड्यातील सर्व ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक शनिवारी शहरात घेण्यात आली. यानंतर आयोजित पत्रपरिषदेत दीपक नणनवरे यांनी सांगितले की, ब्राह्मण समाजाचे मागे अधिवेशन झाले. त्यात समाजाला आरक्षण नको, अशी भूमिका घेण्यात आली होती. मात्र, त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. ब्राह्मण समाजात गुणवत्तेची कमी नाही. मात्र, व्यावसायिक शिक्षण महागडे झाले आहे. आर्थिकदृष्ट्या व्यावसायिक शिक्षण घेणे आता परवडत नसल्याने अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना त्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही सध्याची परिस्थिती लक्षात घेता आता आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. व्यावसायिक शिक्षणासाठी आर्थिक आरक्षण ब्राह्मण समाजालाही देण्यात यावे, तसेच सरकारी नोकरीसाठीही आरक्षण देण्यात यावे. तत्पूर्वी, शैक्षणिक, व्यावसायिक, तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, तसेच महामंडळासाठी ५०० कोटींची तरतूद करण्यात यावी. अनिल मुळे यांनी सांगितले की, या मागण्यांसाठी २२ रोजी मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. यासाठी प्रत्येक विभागात बैठका घेण्यात येत आहेत. आजच्या बैठकीत विश्वजित देशपांडे, सुरेश मुळे, विजया कुलकर्णी, प्रमोद झाल्टे, सचिन पांडे-पाटील, धनंजय कुलकर्णी, शुभांगी कुलकर्णी, गीता आचार्य, मिलिंद दामोदरे, अनिल खंडाळकर, अभिषेक कादी आदी पदाधिकारी हजर होते.
चौकट
अन्य मागण्या
ब्राह्मण पुरोहितांना मासिक ५ हजार रुपये मानधन देण्यात यावे.
ब्राह्मण विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह स्थापन करावे.
केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत करावे.
शिक्षण, नोकरी, राजकीय क्षेत्रांत अनारक्षित विभागात आरक्षित उमेदवारांना आवेदन करण्यास मज्जाव करावा. ज्याद्वारे खुल्या गटात असलेल्या जातींना न्याय देण्यात यावा.