कोरोनाविरुद्ध प्रभावी लढ्यासाठी टास्क फोर्स स्थापन करा; खंडपीठाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 04:38 PM2020-08-19T16:38:38+5:302020-08-19T16:40:22+5:30
कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
औरंगाबाद : कोविड-१९ विरोधात प्रभावी लढ्याकरिता १२ जिल्ह्यांमध्ये टास्क फोर्सची स्थापना करण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे आणि न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि. १८) दिले आहेत.
कोविडवर उपचार आणि प्रतिबंध व पायाभूत सोयी-सुविधांसंदर्भात खंडपीठाने मंगळवारी नव्याने अनेक मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातून २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुरू करावी आणि त्या क्रमांकांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. खासगी रुग्णालयांमधून उपलब्ध बेडची माहिती अद्ययावत ठेवून ते उपलब्धतेसाठी नियंत्रक नेमावेत. येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये समानता असावी. रुग्णांकरिता आवश्यक रुग्णवाहिका उपलब्ध असतील याची काळजी घ्यावी, तसेच त्यासंदर्भातील फोन क्रमांक प्रसिद्ध करावेत. ज्येष्ठ नागरिकांना उपचारासाठी आवश्यक ती सर्व मदत करावी, असेही निर्देश दिले आहेत.
रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या शुल्काबाबतच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती स्थापन करावी. नोडल अधिकारी नेमावा. ज्या खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध असूनही ते उपलब्ध न करणाऱ्यावर कारवाई करावी. रुग्णसेवेसाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करावेत, त्यांचे वेतन वेळेवर देण्यात यावे, तसेच त्यांच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात यावी, असे खंडपीठाने म्हटले आहे. औरंगाबादेत झालेल्या अँटिजन टेस्टची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याचे नमूद करीत कोरोनाविरोधातील या लढ्यात समर्पित कार्य करणाऱ्या आरोग्य, प्रशासकीय, स्वच्छता, पोलीस यांचे कौतुक करतानाच, अशीच कामगिरी यापुढेही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, तत्कालीन जिल्हाधिकारी उदय चौधरी आणि पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा विशेष उल्लेख करीत, संबंधित सर्व विभागांनी साथरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचे खंडपीठाने कौतुक केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून कोविडवर मात करणे शक्य होणार असल्याचे नमूद करीत खंडपीठाने ‘हम होंगे कामयाब’ या कवितेच्या ओळीचा उल्लेख केला आहे. खंडपीठाने नेमलेल्या अमिकस क्युरी ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख यांनी या कामापोटीचे मानधन कोविड उपचारांकरिता देत असल्याची नोंदही खंडपीठाने घेतली. लातूर मनपाच्या वतीने अॅड. व्ही. डी. होन, औरंगाबाद मनपातर्फे अॅड. अंजली दुबे, नांदेड मनपाच्या वतीने अॅड. आर. के. इंगोले, अमळनेर नगर परिषदेच्या वतीने अॅड. गिरीश वाणी, तर अॅड. भरत वर्मा यांनी हस्तक्षेपकातर्फे काम पाहिले.