प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद औरंगाबाद : शहरात असे अनेक गरीब, निराधार लोक आहेत, ज्यांना अन्न न मिळाल्याने उपाशीपोटी झोपावे लागते... एक वेळचे जेवणही त्यांना मिळणे कठीण झाले आहे. यापुढे या लोकांनी उपाशीपोटी झोपू नये, यासाठी तीन दिवसांपूर्वी ‘रोटी बँक’ सुरू करण्यात आली आहे. येथे २५० अन्नदाते दररोज दोन पोळ्या व भाजी आणून देत आहेत. गरजू, गरीब, हातावर पोट असणारे मजूर, हमाल ते अन्न घेऊन आपली भूक भागवत आहेत. ‘रोटी बँके’च्या माध्यमातून मानवतेचे मोठे कार्य शहरात सुरू झाले आहे. जिन्सी- बायजीपुरा रोडवरील ‘हारूण मुकाती इस्लामिक सेंटर’ ने ‘रोटी बँके’ची स्थापन केली आहे. अनेकांकडे रोज अन्न शिल्लक राहते. यातील काही नागरिक आपल्याकडे शिल्लक राहिलेले चांगले अन्न या बँकेत आणून देत आहेत. हेच अन्न गरीब, निराधारांना वाटप केले जात आहे. मात्र, ज्या अन्नदात्यांनी नावनोंदणी केली आहे, त्यांच्याकडीलच अन्न स्वीकारले जाईल. या उपक्रमाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आजघडीला या ‘रोटी बँके’ मध्ये २५० अन्नदात्यांनी नोंदणी केली आहे. सर्व जण सकाळ व संध्याकाळ बँकेत दोन पोळ्या व भाजी आणून देत आहेत. अन्न ठेवण्यासाठी रोटी बँकेत खास पुण्याहून फ्रीजर तयार करून आणण्यात आला आहे. यात एकाच वेळी अन्नाची ७५० पाकिटे ठेवता येतील, एवढी क्षमता आहे. यासाठी सध्या एक कर्मचारी नियुक्त केला आहे. सकाळी ११ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत रोटी बँक सुरू राहणार आहे. लग्नात शिल्लक राहिलेले अन्न नेण्याची व्यवस्था हारु ण मुकाती इस्लामिक सेंटरचे संस्थापक युसूफ मुकाती यांनी सांगितले की, ‘रोटी बँके’त येत्या महिनाभरात ७०० अन्नदात्यांची नोंदणी होणार आहे. तसेच गरीब, गरजू ही अन्नाची पाकिटे नेण्यासाठी येथे येत आहेत. आलेल्या अन्नाची तपासणी करून ते फ्रीजरमध्ये ठेवले जाईल. लग्न, समारंभात मोठ्या प्रमाणात अन्न शिल्लक राहते; अशांनी जर आमच्या सेंटरशी संपर्क साधला तर आम्ही आमचे लोक व गाडी ते अन्न नेण्यासाठी लग्नस्थळी पाठवू व रोटी बँकेच्या माध्यमातून गरजू, गरिबांना ते अन्न वाटप करू.
‘रोटी बँके’ची स्थापना
By admin | Published: December 20, 2015 11:44 PM