युती झाली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही; भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी जिल्ह्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 01:58 PM2019-04-09T13:58:31+5:302019-04-09T14:00:18+5:30

भाजपचे दोन-तीन पदाधिकारीच शिवसेनेच्या प्रचारात 

Even if there was a coalition, the leaders did not get involved; BJP leaders, workers to campaign outside the district | युती झाली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही; भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी जिल्ह्याबाहेर

युती झाली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नाही; भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी जिल्ह्याबाहेर

googlenewsNext
ठळक मुद्देयुतीमध्ये आलबेल नाही

- राम शिनगारे 
औरंगाबाद : भाजप-शिवसेनेची युती असली तरीही नेत्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसते आहे. जिल्ह्यातील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी युतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याऐवजी स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इतर जिल्ह्यांत गेले आहेत. तेथील मतदान झाल्यानंतर शेवटच्या एक-दोन दिवसांसाठी औरंगाबादेत दाखल होणार असल्याचे या नेत्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीत  शिवसेनेच्या वाट्याला आहे. येथे विद्यमान खासदारांनाच शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली. युती होण्यापूर्वी भाजप व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये विविध कारणांवरून कलगीतुरा रंगलेला होता. युती झाल्यानंतरही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत असलेली शिवसेनेची सोबत तोडून टाकावी, त्याशिवाय प्रचारात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. शेवटी महापौरांच्या बंगल्यावर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची समन्वयाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेससोबत असलेली युती सोडण्यास शिवसेना तयार झाली. मात्र, जि.प. अध्यक्षा राजीनामा देणार नाहीत. त्यांचा कालावधी संपल्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होईल. तोपर्यंत काँग्रेसची जि.प.मध्ये असलेली सत्ता कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले.

या बैठकीनंतर भाजपच्या बहुतांश पदाधिकाऱ्यांनी बीड, जालना, नागपूर आदी ठिकाणच्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला प्राधान्य दिले आहे. भाजपच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर देशव्यापी दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळीच त्या हैदराबादहून श्रीनगरकडे रवाना झाल्या. तेथे त्या चार दिवस राहतील. त्यानंतर इतरही ठिकाणी त्यांचे नियोजित दौरे आहेत.  औरंगाबादेत युतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी  एक-दोन दिवसांचा वेळ काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय केणेकर यांनी शहरातील १२ सहकाऱ्यांना घेऊन मागील दहा-बारा दिवसांपासून नागपुरात तळ ठोकला आहे.  भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  डॉ. भागवत कराड , शहर उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे यांनी बीड जिल्हा जवळ केला आहे. त्यांच्यासह सतीश नागरे, प्रशांत देसरडा, समीर राजूरकर, डॉ. राम बुधवंत, संग्राम पवार अशी पदाधिकाऱ्यांची फौज आहे.  माजी महापौर भगवान घडामोडे, नगरसेवक प्रमोद राठोड, राजू शिंदे आदींसह इतर नगरसेवकांनी जालना जिल्ह्यास प्राधान्य दिले . 

हे करताहेत युतीचा प्रचार
औरंगाबादेतील युतीच्या उमेदवाराचा प्रचार भाजपचे आ. अतुल सावे करीत आहेत. त्यांनी पूर्व मतदारसंघाच्या बाहेर जाण्यास प्राधान्य दिलेले नाही. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रचार करण्यात प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. याचवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनीही वैजापूर तालुक्यातील प्रचारात सहभाग नोंदवला आहे. त्यातही त्यांनी स्वतंत्र प्रचार सुरू केला असल्याची माहिती आहे. प्रवक्ते शिरीष बोराळकर हे एकमेव शिवसेना नेत्यांसोबत प्रचारात सहभागी होत भाजपची बाजू सांभाळत असल्याचे चित्र आहे. शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या घरी दु:खद घटना घडलेली असल्यामुळे ते अद्याप प्रचारात सहभागी झालेले नाहीत.

 

Web Title: Even if there was a coalition, the leaders did not get involved; BJP leaders, workers to campaign outside the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.