सिल्लोड: तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वारा व विजेच्या कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला. यात उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले. जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. अनेक घरांवरील टिन पत्रे उडाली. अनेक जनावरे जखमी होऊन मरण पावली. आजही अवकाळी पावसाने तडाखा दिला, मात्र कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी भर पावसात नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
आज दुपारी कृषिमंत्री सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ, हट्टी, सासुरवाडा, खुल्लोड, निल्लोड, बाभूळगाव, गेवराई सेमी परिसरात त्यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. हताश न होता, धीर धरावा सरकार नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दांत मंत्री सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.
झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल पाठविण्याचे निर्देश मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले. बऱ्याच ठिकाणी विजेचे खंबे पडल्यामुळे काही गावांत वीज पुरवठा खंडित झाला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने देखील दक्ष राहून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना देखील यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.
त्यांच्या सोबत सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, तहसीलदार विक्रम राजपूत,तालुका कृषी अधिकारी न्यानेश्वर बरदे, गटविकास अधिकारी डी. एस. आहिरे, महावितरण चे कार्यकारी अधिकारी जाधव सहित तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी हजर होते.
आणखी दोन तीन दिवस काळजी घ्या दरम्यान नुकसानीची पाहणी करीत असताना आज देखील विविध ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. आणखी दोन - तीन दिवस अवकाळी पाऊस पडण्याची स्थिती कायम राहिल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.