लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पर्यटकांना स्वागतशील, सुखद अनुभव देण्यासाठी स्थानिक प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्व विभाग यांची सक्रिय भूमिका आहे. शिवाय पाणी, वीज, रस्ते, वाहतूक, खरेदी, खाद्य सुविधा दर्जेदार उपलब्ध होणे, याबाबीदेखील महत्त्वाच्या असल्याचे मत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सी आणि महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित अजिंठा-एलोरा कॉन्झर्व्हेशन अॅन्ड टुरीझम डेव्हलपमेन्ट या प्रकल्पाच्या दुसºया टप्प्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यशाळेचे उद्घाटन विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते झाले. यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, पोलीस अधीक्षक आरती सिंह, विनीत सरीन, जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीचे नारी हीतो यांच्यासह पुरातत्व आणि पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जागतिक वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळ पर्यटन स्थळांसोबत एकंदरीत औरंगाबादच्या पर्यटन विकासाच्या गतिमान वाटचालीसाठी १९९२ पासून सुरू असलेला अजिंठा-वेरूळ संवर्धन आणि पर्यटन विकास प्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर म्हणाले. औरंगाबाद हा पर्यटन आणि औद्योगिक विकासाचा राज्यातील उल्लेखनीय जिल्हा आहे. त्याचा गतिमान विकास करण्यामध्ये अजिंठा, वेरूळ संवर्धन आणि पर्यटन विकास प्रकल्पांतर्गत १९९२ ते २००२ या पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय काम झाले. २००२ नंतरच्या पुढील काळात त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या अजिंठा अभ्यागत केंद्र आणि वेरूळ अभ्यागत केंद्रामुळे देशी-परदेशी पर्यटकांना सुविधा मिळत आहेत, असेही भापकर म्हणाले.पर्यटकांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची, रस्त्यांची, देशाची, प्रतिमा तयार होत असते. यादृष्टीने आपण सर्वांनी गुणवत्तापूर्ण सेवा देण्याच्या उद्देशाने एकत्रित प्रयत्न करून औरंगाबाद पर्यटन स्थळांचे जतन व संवर्धन करावे, असे आवाहन यावेळी एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक वाघमारे यांनी केले....तर पर्यटकांचे आकर्षण वाढेलदौलताबाद, गवताळा, पितळखोरा या पर्यटन स्थळांसाठी दळणवळणात सुधारणा झालेली आहे. जिल्ह्यातील लेणी परिसरात परदेशी व इतर राज्यांतील पर्यटकांची संख्या ही जास्त आहे. तिथे कृषिपर्यटन ही संकल्पना राबवून स्थानिक लोकांना रोजगाराची संधी देण्याबाबत काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत विचार सुरू आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांना या ऐतिहासिक ठिकाणांची अधिकृत माहिती योग्य पद्धतीने दिल्यास निश्चितच पर्यटकांचा या पर्यटन स्थळांबाबतचा आदर, आकर्षण वाढेल, त्या दृष्टीने प्रशिक्षित गाइड वेरूळ, अजिंठा या ठिकाणी अधिक संख्येने उपलब्ध करून देण्याबाबतही लवकरच कार्यवाही करण्यात येईल.
पर्यटकांसाठी सर्वांनी स्वागतशील असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 12:35 AM