परीक्षा केंद्रांवर केवळ ६१ सहकेंद्रप्रमुख दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 08:54 PM2018-10-16T20:54:59+5:302018-10-16T20:55:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी परीक्षांना सोमवारपासून सुरू झाली आहे. नियोजनाचा अभाव असल्यामुळे पहिल्याच दिवशी सावळा गोंधळ समोर आला होता. दुसऱ्या दिवशी कोठेही गोंधळाचा प्रकार समोर आला नाही. मात्र, २२५ परीक्षा केंद्रांवर नेमलेल्या २२५ सहकेंद्रप्रमुखांपैकी केवळ ६१ जणच दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यापीठाच्या पदवी परीक्षा कॉपीमुक्त घेण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा, भरारी पथकांची नेमणूक करण्याच्या घोषणा परीक्षा सुरू होण्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. मात्र या यंत्रणाची उभारणीच महाविद्यालयांनी केली नसल्यामुळे विविध परीक्षा केंद्रांवर कॉप्यांचा महापूर आला असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली. याचवेळी विद्यापीठाने नेमलेल्या भरारी पथकतील बहुतांश प्राध्यापकांना संबंधित महाविद्यालयांनी परीक्षेचे काम करण्यास परवानगी दिली नसल्याचे दिसून आले. यात २२५ परीक्षा केंद्रांवर २२५ सहकेंद्रमुखांची नियुक्ती केली होती.
या सहकेंद्रप्रमुखांच्या नियंत्रणातच परीक्षा घेण्यात येतात. केंद्रप्रमुख हा त्या महाविद्यालयाचा प्राचार्य असतो. मात्र, विद्यापीठाने पाठविलेला सहकेंद्रप्रमुख हा जबाबदार व्यक्ती असताना केवळ ६१ केंद्रांवर सहकेंद्रप्रमुख दाखल झाले आहेत. याविषयी परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना विचारले असता, त्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांची संख्या कमी असून, त्याही महाविद्यालयांत परीक्षा सुरू आहेत. त्याठिकाणी प्राध्यापकांना कामे असल्यामुळे अनेकांनी सहकेंद्रप्रमुख म्हणून दाखल होण्यास नकार कळविला. यामुळे त्यांच्या जागी दुसरे नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचेही डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. कॉपीमुक्तीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. मात्र शहरातील काही महाविद्यालयांचा अपवाद वगळता कोणत्याही केंद्रावर ही यंत्रणा उभारण्यात आलेली नाही.
कुलगुरू, परीक्षा संचालक केंद्रांच्या भेटीला
परीक्षेच्या दुसºया दिवशीही कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी शहरातील रफीक झकेरिया कॅम्पसमधील मराठवाडा कॉलेज आॅफ एज्युकेशन केंद्राला भेट देत परीक्षेची पाहणी केली. परीक्षा संचालक डॉ. जयश्री सुर्यवंशी यांनीही आडूळ, पाचोड, चित्तेपिंपळगाव आणि शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला भेटी दिल्या.