- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे.
जिल्ह्यात १० पैकी ६ सहकारी, तर ४ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन एकूण १८७०० मेट्रिक टन गाळप क्षमता आहे. हे वाचून कोणालाही हा जिल्हा शेती व कारखानदारासाठी सधन असल्याचे जाणवेल; मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजघडीला यातील अवघ्या ३ कारखान्यांत उसाचे गाळप केले जात आहे. एका खाजगी व पाच सहकारी कारखान्यांतील मशिनरीला गंज लागला आहे. सुरू असलेल्यांमध्ये कन्नड येखील बारामती अॅग्रो, औरंगाबाद तालुक्यातील संभाजीराजे खाजगी कारखाना, पैठण येथील संत एकनाथ कारखाना व गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर्स यांचा समावेश आहे.
या कारखान्यांनी आजपर्यंत ४ लाख २८ हजार ९१५ मे. टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून ३ लाख ५२ हजार ६५० मे.टन साखर तयार झाली आहे. सरासरी ८.२२ टक्के उतारा मिळत आहे. यात संत एकनाथ कारखान्याने केलेले गाळप व साखर उत्पादन याच्या आकडेवारीचा समावेश नाही. या कारखान्याने आजपर्यंत ६६ हजार मे. टन साखर उत्पादन केले आहे; मात्र साखर आयुक्तालयात याची नोंदच नाही. कारण, या कारखान्याला ऊस गाळप करण्याची परवानगी साखर आयुक्तालयाने दिली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे खुलताबाद परिसरातील घृष्णेश्वर साखर कारखाना उभारणीपासून आजपर्यंत बॉयलर पेटलेच नाही.
पैठण येथील शरद साखर कारखान्याचीही हीच परिस्थिती आहे; मात्र एकेकाळी साखर उत्पादनात गाजलेला गंगापूरचा कारखाना असो वा सिल्लोडचा सिद्धेश्वर कारखाना किंवा फुलंब्रीचा देवगिरी कारखाना; मागील अनेक वर्षांपासून हे साखर कारखाने बंद आहेत. कर्जबाजारीपणा, राजकारण हीच या बंद कारखान्यांमागील ‘खेळी’ होय. जिल्ह्यातील २० हजार २६६ हेक्टरवर उसाची लागवड होत आहे. कारखाने बंद पडल्यामुळे लागवडीवरही परिणाम झाला आहे.
साखर कारखाने बंद राहणे शेतकर्यांच्या हिताचे नाहीजिल्ह्यातील ६ कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. याचा अंतिम फटका ऊस उत्पादक, ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगारांना बसत आहे. यातून जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ऊस घेऊन जाण्यास कोणी तयार नाही. अशा वेळी बंद कारखाने सुरू झाल्यास त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल. राज्य सरकारनेही याकडे सहकाराच्या भावनेने पाहिले पाहिजे. साखर कारखाने पुन्हा सुरू करून त्या तालुक्यातील अर्थचक्र गतिमान केले पाहिजे. यासाठी सरकारने साखर कारखान्यांना पाठबळ दिले पाहिजे व शेतकरी, ऊसतोड कामगारांना जगविले पाहिजे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, देवगिरी सहकारी साखर कारखाना.