राम शिनगारे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर : शासनाने बहुप्रतीक्षित राज्यातील अकृषी व शासनमान्य अभिमत विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या ४० टक्के जागा भरण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २ हजार ६६८ मंजूर प्राध्यापकांच्या पदांपैकी १ हजार ४३२ रिक्त जागा आहेत. त्यातील ६५९ पदांची भरती होणार आहे. गडचिरोली विद्यापीठाचा अपवाद वगळता इतर १४ विद्यापीठांना भरतीची जाहिरात काढण्यासाठी शासनाकडून ‘एनओसी’च मिळत नसल्याचे समोर येत आहे.
या विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांच्या मंजूर जागांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक रिक्त आहेत. कंत्राटी प्राध्यापकांच्या नेमणुका विद्यापीठांमध्ये कराव्या लागत आहेत. त्याचा परिणाम नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये विद्यापीठांची घसरण होण्यात झाला आहे. राज्यातील सर्वच विद्यापीठांनी आरक्षण सेलकडून बिंदू नामावली तपासून घेत पदभरतीच्या ‘एनओसी’साठीचे प्रस्ताव उच्चशिक्षण संचालकांमार्फत मंत्रालयात पाठविले आहेत. तेथून एनओसी अद्यापही मिळालेली नाही.
सहा वर्षांपासून पदभरती रखडलेलीच
तत्कालीन राज्य शासनाने २५ मे २०१७ रोजी सर्व विभागांमधील पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम होईपर्यंत नोकरभरतीवर बंदी घातली होती. आकृतिबंध तयार झाल्यानंतर शासनाने नेमलेल्या उपसमितीने विद्यापीठांमधील रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्यास मंजुरी दिली. त्यानुसार ६५९ पदांच्या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर सरकार बदलले. कोरोनामुळे भरती प्रक्रिया थांबली. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी वित्त विभागाच्या उपसमितीने विद्यापीठांमधील ६५९ पदांच्या भरतीस मान्यता दिली. त्यास अद्याप मुहूर्त लागलेला नाही.
विद्यापीठातील प्राध्यापकांची आकडेवारी
विद्यापीठ मंजूर पदे रिक्त पदे मान्यताडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. २५९ १४० ७३स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. १५७ ५७ ११मुंबई विद्यापीठ. ३७८ २११ १३६एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई. २५८ १२९ ७८कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ. ४३ २१ १२राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ. ३३९ १६० ९२पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर. ४६ १६ ०७शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. २६२ १२४ ७२सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. ४०० १९१ १११कवयित्री बहिणाबाई चौधरी उ. म. विद्यापीठ. १११ २८ ०६ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. १२१ ३७ १३