पोलिसांच्या कुटुंबियांची पाण्यासाठी भटकंती; नवीन टुमदार ७५० घरांना नाही पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 02:18 PM2019-11-16T14:18:18+5:302019-11-16T14:20:47+5:30
मनपाकडून एकच नळ कनेक्शन देण्यात आल्याने त्यातून मिळणारे पाणी पुरेसे नाही.
औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पोलीस आयुक्तालय परिसरात कर्मचाऱ्यांसाठी ७५० सदनिका उभारण्यात आल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून सदनिकांमध्ये कर्मचारी कुटुंबियांसह राहत आहेत. मात्र, मनपाकडून पुरेसे पाणी दिल्या जात नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मनपाने वाढीव पाणी द्यावे या मागणीसाठी शुक्रवारी सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे थेट महापालिकेत दाखल झाले.
शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना हाती घेतली होती. या योजनेतून पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात मोडकळीस आलेल्या आणि जीर्ण वसाहतीमधील कौलारू घरे पाडून त्याठिकाणी अपार्टमेंट उभारून पोलिसांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याकरिता पुढाकार घेऊन मंजुरीसह निधी उपलब्ध करून घेतला. पोलिसांसाठी नवीन ७५० सदनिका उभारण्यात आल्या. या सदनिकांमध्ये पोलीस कर्मचारी कुटुंबियांसह राहत आहेत. परंतु पाण्याची सुविधा नसल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली.
मनपाकडून एकच नळ कनेक्शन देण्यात आल्याने त्यातून मिळणारे पाणी पुरेसे नाही. वाढीव पाणीपुरवठ्याकरिता पोलीस प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आज मनपा कार्यालयात आले. त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेऊन नवीन सदनिकांसाठी नळ कनेक्शन देण्याची मागणी केली. महापौर घोडेले यांनी तात्काळ प्रभारी कार्यकारी अभियंता संधा यांच्याशी संपर्क करून पोलीस आयुक्तालयातील ७५० सदनिकांसाठी नळ कनेक्शन देण्याची तातडीने कार्यवाही करावी असे आदेश दिले.
खाजगी टँकरचे पाणी
पोलीस आयुक्तालयातील नवीन सदनिकांमध्ये राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना अनेकदा महागडे खाजगी पाण्याचे टँकर मागवावे लागते. पिण्यासाठी पाणी नसल्यास पाण्याचे जारही विकत आणावे लागतात. पाण्यावर होणारा अतिरिक्त खर्च कर्मचाऱ्यांना परवडणार नाही.